ट्रेक विकटगडाची....
05.08.2017
विकटगडाची ट्रेक बिकट जरी असली तर माझ्या फँमिली मेंबर्सनी खूप एंजॉय केली. एकूण आम्ही सहा जण होतो. त्यात मी आणि माझा परम मित्र रूपेश सावंत सोडला तर बाकीच्यांना ट्रेकचा काहीच अनूभव नव्हता. एकंदरीत उपलब्ध माहीतीनूसार गड चढाई सोपी वाटत होती. म्हणुनच फँमिली ट्रेकसाठी या गडाची निवड केली होती आणि चढाई कठीण असून पण माझ्या फँमिली मेंबर्सनी लिलया पेलवली. नेरळ वरून ४ कीमीचे अंतर ऑटोने पार केल्यानंतर फणसवाडीत पोहोचलो.. चार पाच बच्चेकंपनी मार्गदर्शकांचा चमू आमचीच वाट पाहत उभा होता. आम्हाला सुरूवातीला अशा मार्गदर्शकांची गरज वाटली नाही पण पुढे गेल्यावर मात्र अनेक वाटा आम्हाला फसवू पाहत होत्या. त्यावेळी एक मुलाला वाट विचारली तर त्याने आपले गाईडच पुढे करून ५०० रूपये सांगीतले. पत्ता सांगायची कींमत तेव्हा मला कळली. त्याचे गाईड न घेता आम्ही दिसेल त्या वाटेने निघालो पण ती वाट साफ चुकीची होती. आणि ते आम्हाला दाखवून दिले एका वयस्कर माणसाने (पण पुढच्या प्रवासात त्यांना आम्ही मामाच बोलू लागलो). मग तेही आमच्या सोबत चालू लागले. पुढे गेल्यावर त्यांनाच गाईड करून सोबत घेतले. खिंडीपर्यंत सोडण्याचे २५० ठरले. दाट जंगल, दगडातील चढण , रीमझीम पाऊस चढाईला रंगत आणत होता. काही ठीकणी महीला मेंबर्सना ट्रेक करताना खुप कठीन गेले. खिंडीत पोहोचलो तेव्हा मागे पुढे पांढरी दुलई पांघरलेली दरी पाहून आम्हा सर्वांच्या चेहऱ्यावर भीती मिश्रीत आनंद ओसांडत होता. आणि काही क्षणात पांढरी दुलई बाजूला सारून दरी परत हीरवीगार झाली. छातीत धडकी भरवणारी खोलाई आणि बाजूला असलेला कडा आम्हाला चढाईसाठी आव्हान देऊ लागला. तेही आव्हान एकमेकांना सांभाळत पार केले न केले तोच समोर नियमीत ट्रेकर्सनाही अवघड वाटेल असा चौकोणी कडा समोर आ वासून उभा होता. तिथे २०
जणांचा ग्रुप ते पार करण्यासाठी अगोदरच स्ट्रगल करत होता. आमच्या एका मेंबरची तर भीतीने गाळण उडाली. तो ढेपाळला त्या सोबत आम्हालाही माघार घ्यावी लागते की काय अशी परीस्थिती निर्माण झाली. मला अस वाटते की जिथे संकट, आव्हान तिथे देव हजर असतो. तसेच झाले आमच्या ग्रुपमधील माझ्या मित्र रूपेशने त्याला धीर दिला आणि त्याच्या मनावरचे ओझे त्याच बरोबर पाठीवरचे ओझेही हलके करून त्याला पुढे लावले. आणि तिथे "देवा" नावाचा देव आमच्या मदतीला धावून आला. एक एक करून सगळ्यांना तो चौकोन
कडा पार करायला मदत केली. हा देवा त्या वीस जणांच्या ग्रुपमधील एक होता. मनोमन देवाचे आभार मानून आम्ही पुढच्या वाटेला लागलो. अजून पण चढाई संपली नव्हती. थोड पुढे गेल्यावर जरा छोट्या खणी वाटेने दरीत उतरावे लागले. आखूड वाट आणि बाजूला दरी अशा परीस्थितीत तोही टप्पा पार केला. त्या वाटेने जाताना बाजुच्या डोंगरात भली गुहा आणि खालच्या अंगाला पाण्याच्या टाक्या नितळ पाण्याने भरलेल्या होत्या. वारा उगाचच पाण्यावर तरंग निर्माण करत होता. ह्या अशा काही गोष्टी निसर्गाच्या सानीध्यातच अनुभवल्या जाऊ शकतात. पुढे एक भली मोठी लोखंडी शिडी पार करून विकटगडावरचे मंदीर दिसेल अशा ठीकाणी विश्रांतीला बसलो. समोर दिसनारे चित्र खुपच विलोभणीय होते. तिथून सहज दिसणारे पनवेल जवळील कलावंतीन आणि प्रबळगड पुढच्या ट्रेकसाठी खुणावत होते. दूरवर दिसणारा पाण्याने तुडूंब भरलेला डँम विलक्षणपणे चमकत होता. सोबत आणलेले खाद्यपदार्थ खावून आम्ही पुढच्या वाटेला लागलो. तिथून थोड्याच चढाई नंतर आम्ही पेबचा टॉप गाठला.. थंड वातावरण, ढगांचा पाठशिवणीचा खेळ, वाऱ्याचा मारा सारं काही अद्भूत होत. पेबच्या माथ्यावर एकमुखी दत्ताचे सुंदर मंदीर आहे.. काळ्या दगडातील मूर्ती खुपच तेजस्वी वाटते.जे पहील्यांदाच ट्रेकला आले होते त्यांच्या साठी विकटगडाच्या माथ्यावरचे वातावरण नवीन आणि हवेहवेसे वाटत होते..पाय निघता निघत नव्हता. परत एकदा दत्तचरणी नतमस्तक होऊन, परतीचा मार्ग धरला. आम्ही परतीचा मार्ग नेरळ माथेरान ट्र्याकचा धरला, तुलनेने थोडा सोपा, शिवाय कड्यावरचा गणपती आणि धबधबे पाहायचे होते. पेबच्या बुरूजानजीकच्या दोन शिड्या सोडल्यातर फारसे कष्ट पडले नाहीत. पुढची वाट मात्र निमुळती होती. एका बाजूला कडा आणि दुसऱ्या बाजूला दरी. अशी वाट पार करत कड्यावरचा गणपती पाहायला गेलो. दगडातील साकारलेली विशाल बाप्पाची मूर्ती डोळ्यात मावत नव्हती. ट्रेकर्सचे रक्षण करण्यासाठीच जणू बाप्पा तिथे उभा होता. काहीवेळ बाप्पासोबत बसून आम्ही नेरळ माथेरान ट्र्याक धरला आणि खऱ्या अर्थाने आमची गाडी रूळावर आली. रेल्वे रूळावर कोसळणाऱ्या थंड धबधब्याचा मनसोक्त आनंद घेत मार्गस्थ झालो. आणि अजून एका यशस्वी ट्रेकचा समावेश आमच्या खात्यात जमा झाली..
No comments:
Post a Comment