Monday, 29 January 2018

चढाई कळसूबाई शिखरची..

चढाई कळसूबाई शिखरची..
ही ट्रेक माझ्या कायम लक्षात राहील.घरातून निघताना पडत असलेला तूफानी पाऊस पाहून वाटत होत की..जावू की नको..पण निघालो. कल्याण स्टेशनहून रात्री १.४१ शेवटची कसारा ट्रेन पकडून आम्ही ९ जण ३ वाजता कसाऱ्याला पोहोचलो..डोळ्यावर झोप होती...रपरप पडणारा पाऊस मनातील धाकधूक वाढवत होतो.पण माझा मित्र अंकूश हा एकदा तिथे जावून आला होता.. (यावेळी केवळ आमच्यासाठी आला होता) त्यामुळे अर्धी भीती नाहीशी झाली होती. कसाऱ्याहून पहाटे ४.३० वाजता आम्ही "बारी" या बेस गावाकडे निघालो.आम्ही तिथे पोहचेपर्यंत दिशा फाकल्या होत्या. पावसाचा जोर चालूच होता. गावात पोहचलो तेव्हा तिथे ट्रेकर्सची जणू जत्राच भरली होती..हजारो संख्येने ट्रेकर्स आले होते. ते सर्व पाहून झोप पार उडाली. आवश्यक तेवढे सामान घेवन सकाळी ७ वाजता ट्रेकला सुरूवात केली. आमच्या ९ जणांच्या ग्रुपमध्ये मी, अंकूश पिलाने, कल्पेश राणे, रूपेश सावंत, अवधूत सावंत, संतोष मडव, विश्राम घाडीगांवकर,गणेश कालूलकर आणि अविनाश पाटील एवढे जण होतो. ट्रेक लिडर अंकूशच्या मा्र्गदर्शनाखाली ट्रेकला सूरूवात केली. सोबत खाण्यासाठी उकडलेली मक्याची कणसे, बिस्कीटे, चिवडा,भाजलेले चणे,चहा अशी भरगच्च रसद घेतली होती. सुरूवातीला चिखलाच्या वाटेवरून चालताना खूपच घसरायला होत होतं.. चढण आणि निसरडा चिखल यातून चढाई करताना कठीण जात होते. थोडी अशी कसरत केल्यानंतर काही ठीकाणी दगडाच्या पायऱ्या आढळल्या. मात्र १ तासाच्या चढाईनंतर पुढे लोखंडी शिड्यांवरुन चढाई करताना थोड कठीण गेले. ज्यानी ट्रेकर्सना जाण्यासाठी शिड्या लावल्या आहेत त्यांना एक सलाम... ( एकूण शिखर चढाई मध्ये चार शिड्या आहे त्याही अवघड ठीकाणी.) ठीकठीकाणी खाद्य पदार्थाचें झोपडीवजा स्टॉल पाहून त्या गावकरी लोकांबद्दल आश्चर्य वाटत होतं.. पोटासाठी माणूस कोणत्याही खालच्या थराला न जाता स्वकष्ठाने  कमवत होता. चढाई करताना अर्ध्या अंतरावर अजून एक मोठी शिडी लागली. तिथे मात्र अंगावर भीतीचा काटा आला होता. ट्रेकर्सच्या झालेल्या गर्दीमुळे शिडीवरून उतरणारे आणि खालून चढणारे  यांच्यामध्ये वरचढ होती. दोन्हीकडून शिडीवरून जायला यायला घाई होत होती. शिड्या जरी मजबूत असल्या तरी एकावेळी ३० ते ३५  जणांचे  वजन त्या शिड्यांवर येत होते. त्याचीच भीती जास्त वाटली. अशीच एक शिडी जी कळसूबाईच्या शेवटच्या टोकाला होती. ती ही पार करून शिखरावर १०.३७ वाजता पाय ठेवला. शिखराच्या माथ्यावरील नजारा अवर्णनीय होता. माझ्याकडे शब्द नाहीत.. घरातून निघाल्यापासून शिखर गाठेपर्यंत जे श्रम लागले होते सर्व कुठल्या कुठे विरुन गेले. आम्ही शिखरावर पोचलो तेव्हा शिखराच्या आजूबाजूच्या लहान मोठ्या पर्यंत रांगाना स्पर्श करणारे ढग विरळ होते. त्यामुळे आजूबाजूचा नजारा स्वर्गीय होता..एका बाजूला रतन गड आणि तिथून काही अंतरावर भंडारदरा डँम पाहावसास मिळत होते..एका बाजूने छोट्या छोट्या पर्वतांचे सुळके हीरवेगार झाल्यावर फारच विलोभनीय वाटत होते आणि ढगांची पांढरी दुलई त्यांवर खुपच शोभून दिसत होती. शिखराचा माथा फारसा मोठा नाहीये. मधोमध असलेले कळसूबाई मातेचे मंदीर छान दिसते. सुमारे १ ते १.३० तासानंतर शिखराच्या चारी बाजूला ढगांचे आच्छादन आल्यावर आम्ही उतरायला सुरूवात केली. त्यावेळी माझ्या मित्रांच्या मते माझ्यामुळे आम्ही सर्वजण एका चांगल्या अर्थाने ढगात होतो. उतरताना लोखंडी शिड्या सोडल्या तर फारसा त्रास झाला नाही. दुपारी १.४५ वाजता शिखराचा पायथा गाठला. तिथून परतीचा प्रवास सुरू झाला आणि आमच्या आयूष्यात अजून यशस्वी चढाई नोंदली गेली.

Sunday, 28 January 2018

ट्रेक विकटगडाची....

ट्रेक विकटगडाची....
05.08.2017

विकटगडाची ट्रेक बिकट जरी असली तर माझ्या फँमिली मेंबर्सनी खूप एंजॉय केली.  एकूण आम्ही सहा जण होतो. त्यात मी आणि माझा परम मित्र रूपेश सावंत सोडला तर बाकीच्यांना ट्रेकचा काहीच अनूभव नव्हता. एकंदरीत उपलब्ध माहीतीनूसार गड चढाई सोपी वाटत होती. म्हणुनच फँमिली ट्रेकसाठी या गडाची निवड केली होती आणि चढाई कठीण असून पण माझ्या फँमिली मेंबर्सनी लिलया पेलवली. नेरळ वरून ४ कीमीचे अंतर ऑटोने पार केल्यानंतर फणसवाडीत पोहोचलो.. चार पाच बच्चेकंपनी मार्गदर्शकांचा चमू आमचीच वाट पाहत उभा होता. आम्हाला सुरूवातीला अशा मार्गदर्शकांची गरज वाटली नाही पण पुढे गेल्यावर मात्र अनेक वाटा आम्हाला फसवू पाहत होत्या. त्यावेळी एक मुलाला वाट विचारली तर त्याने आपले गाईडच पुढे करून ५०० रूपये सांगीतले. पत्ता सांगायची कींमत तेव्हा मला कळली. त्याचे गाईड न घेता आम्ही दिसेल त्या वाटेने निघालो पण ती वाट साफ चुकीची होती. आणि ते आम्हाला दाखवून दिले एका वयस्कर माणसाने (पण पुढच्या प्रवासात त्यांना आम्ही मामाच बोलू लागलो). मग तेही आमच्या सोबत चालू लागले. पुढे गेल्यावर त्यांनाच गाईड करून सोबत घेतले. खिंडीपर्यंत सोडण्याचे २५० ठरले. दाट जंगल, दगडातील चढण , रीमझीम पाऊस चढाईला रंगत आणत होता. काही ठीकणी महीला मेंबर्सना ट्रेक करताना खुप कठीन गेले. खिंडीत पोहोचलो तेव्हा मागे पुढे पांढरी दुलई पांघरलेली दरी पाहून आम्हा सर्वांच्या चेहऱ्यावर भीती मिश्रीत आनंद ओसांडत होता. आणि काही क्षणात पांढरी दुलई बाजूला सारून दरी परत हीरवीगार झाली. छातीत धडकी भरवणारी खोलाई आणि बाजूला असलेला कडा आम्हाला चढाईसाठी आव्हान देऊ लागला. तेही आव्हान एकमेकांना सांभाळत पार केले न केले तोच समोर नियमीत ट्रेकर्सनाही अवघड वाटेल असा चौकोणी कडा समोर आ वासून उभा होता. तिथे २०
जणांचा ग्रुप ते पार करण्यासाठी अगोदरच स्ट्रगल करत होता. आमच्या एका मेंबरची तर भीतीने गाळण उडाली. तो ढेपाळला त्या सोबत आम्हालाही माघार घ्यावी लागते की काय अशी परीस्थिती निर्माण झाली. मला अस वाटते की जिथे संकट, आव्हान तिथे देव हजर असतो. तसेच झाले आमच्या ग्रुपमधील माझ्या मित्र रूपेशने त्याला धीर दिला आणि त्याच्या मनावरचे ओझे त्याच बरोबर पाठीवरचे ओझेही हलके करून त्याला पुढे लावले. आणि तिथे "देवा" नावाचा देव आमच्या मदतीला धावून आला. एक एक करून सगळ्यांना तो चौकोन
कडा पार करायला मदत केली. हा देवा त्या वीस जणांच्या ग्रुपमधील एक होता. मनोमन देवाचे आभार मानून आम्ही पुढच्या वाटेला लागलो. अजून पण चढाई संपली नव्हती. थोड पुढे गेल्यावर जरा छोट्या खणी वाटेने दरीत उतरावे लागले. आखूड वाट आणि बाजूला दरी अशा परीस्थितीत तोही टप्पा पार केला. त्या वाटेने जाताना बाजुच्या डोंगरात भली गुहा आणि खालच्या अंगाला पाण्याच्या टाक्या नितळ पाण्याने भरलेल्या होत्या. वारा उगाचच पाण्यावर तरंग निर्माण करत होता. ह्या अशा काही गोष्टी निसर्गाच्या सानीध्यातच अनुभवल्या जाऊ शकतात. पुढे एक भली मोठी लोखंडी शिडी पार करून विकटगडावरचे मंदीर दिसेल अशा ठीकाणी विश्रांतीला बसलो. समोर दिसनारे चित्र खुपच विलोभणीय होते. तिथून सहज दिसणारे पनवेल जवळील कलावंतीन आणि प्रबळगड पुढच्या ट्रेकसाठी खुणावत होते. दूरवर दिसणारा पाण्याने तुडूंब भरलेला डँम विलक्षणपणे चमकत होता. सोबत आणलेले खाद्यपदार्थ खावून आम्ही पुढच्या वाटेला लागलो. तिथून थोड्याच चढाई नंतर आम्ही पेबचा टॉप गाठला.. थंड वातावरण, ढगांचा पाठशिवणीचा खेळ, वाऱ्याचा मारा सारं काही अद्भूत होत. पेबच्या माथ्यावर एकमुखी दत्ताचे सुंदर मंदीर आहे.. काळ्या दगडातील मूर्ती खुपच तेजस्वी वाटते.जे पहील्यांदाच ट्रेकला आले होते त्यांच्या साठी विकटगडाच्या माथ्यावरचे वातावरण नवीन आणि हवेहवेसे वाटत होते..पाय निघता निघत नव्हता. परत एकदा दत्तचरणी नतमस्तक होऊन, परतीचा मार्ग धरला. आम्ही परतीचा मार्ग नेरळ माथेरान ट्र्याकचा धरला, तुलनेने थोडा सोपा, शिवाय कड्यावरचा गणपती आणि धबधबे पाहायचे होते. पेबच्या बुरूजानजीकच्या दोन शिड्या सोडल्यातर फारसे कष्ट पडले नाहीत. पुढची वाट मात्र निमुळती होती. एका बाजूला कडा आणि दुसऱ्या बाजूला दरी. अशी वाट पार करत कड्यावरचा गणपती पाहायला गेलो. दगडातील साकारलेली विशाल बाप्पाची मूर्ती डोळ्यात मावत नव्हती. ट्रेकर्सचे रक्षण करण्यासाठीच जणू बाप्पा तिथे उभा होता. काहीवेळ बाप्पासोबत बसून आम्ही नेरळ माथेरान ट्र्याक धरला आणि खऱ्या अर्थाने आमची गाडी रूळावर आली. रेल्वे रूळावर कोसळणाऱ्या थंड धबधब्याचा मनसोक्त आनंद घेत मार्गस्थ झालो. आणि अजून एका यशस्वी ट्रेकचा समावेश आमच्या खात्यात जमा झाली..

ट्रेक राजगडाची

09.09.2017
ट्रेक म्हटली अनियमित Time Table आणि कधी काय करावे लागेल हे सांगता येत नाही. मला झोप खुप प्यारी आहे पण पर्वत प्रेम एवढे वाढलेय की झोपेचे खोबरे झाले तरी त्याचं दुखः न करता त्याच्या गोड वड्या कशा करता येईल ते बघतो. थोडक्यात काय? ट्रेक म्हटली की सगळ्या गोष्टींसाठी तडजोड करावी लागते. ट्रेक्सचे फोटो फेसबूकवर अपलोड झाले की 'अरे, काय यार? मला सांगायचस ना. मी आलो असतो ट्रेकला. एकटा एकटा फीर.' अशा Comments यायला लागतात. ट्रेक साठी काय काय करावे लागते त्या ट्रेकर्स ना माहीत.
मी घरातून शनिवारी रात्री 11.35 ला निघालो.सगळ्यांना कांजूरमार्गला जमायचे होते. बरोबर 1.15 वाजता कांजूरला पोचलो. तिथून बसने पुण्याकडे प्रस्थान केले. यावेळी 18 जणांचा ग्रुप होता. 18 जणांमध्ये मी, अंकुश, गणेश, अविनाश, स्वागत, रूपेश, कुलदीप, विलास, इशान, रितेश नितेश, हर्शद , विक्रम , आकाश, सचिन, रोहन, प्रदीप इतक्या जणांचा समावेश होता. बस मध्ये बसल्यावर झोपेची आराधना करायला लागलो. ट्रेकला निघालो की ती अशीच रूसून बसते. मग मनवणी शिवाय पर्याय नसतो. काही केल्या झोप येत नव्हती. बस सुसाट पुण्याच्या दिशेने चालली होती.
आम्ही बरोबर 6.30 वाजता राजगडच्या पायथ्याशी असलेल्या गुंजवणे गावात पोचलो. फ्रेश होवून गरम गरम चहा पोह्याचा नाष्टा करून 7.20 ला ट्रेक सुरूवात केली. साधारणपणे राजगडाच्या 'चोर दरवाजात' पोहचायला 2 तास लागतात. पण आम्हाला साडेतीन तास लागले. मोठा ग्रुप असला की सगळ्याना सोबत घेवून ट्रेक करावी लागते. पायथ्यापासून 90% चढाई आम्ही यशस्वीरीत्या पूर्ण केली. 10 चढाई ही धोकादायक होती. निमुळती वाट त्यात लोखंडी सळ्यांचा आधार घेवून चढाव्या लागणाऱ्या निसर्गनिर्मित पायऱ्या काही मोठ्या, काही छोट्या, कमी अधिक उंचीच्या आव्हानात्मक होत्या. तेही पार करून चोर दरवाजा गाठला. चोर दरवाजातून जेमतेम एक माणूस आत जाईल एवढी जागा होती.
चोर दरवाज्यातून आत आल्यावर खऱ्या अर्थाने राजगडावर पाऊल पडले. परत एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमीवर आम्ही दाखल झाले होतो. तिथूनच समोरच लांबवर दिसणारा बालेकिल्ल्याचा सुळका अभेद्धतेची खात्री पटवून देत होता. आजूबाजूचा हिरवाईने नटलेला परीसर त्यात लाल पिवळी रानफुले सौंदर्यात भर टाकत होती. मी जेवढे डोळ्यात साठवता येईल तेवढे साठवत होतो. किल्ल्याचे हजारो वर्षापूर्वी केलेले बांधकाम अजूनही तसेच होते. पदमावती तलावातील पाणी असो वा चौकोनी विहीरीतील पाणी आपला नितळापणा काही सोडत नव्हते. किल्यावर बऱ्याच ठीकाणी अशा पाण्याच्या सुविधा आहेत. थोडे पुढे चालत गेल्यावर पदमावती मंदीराच्या समोर सईबाईची समाधी पाहावयास मिळली. तिथे असलेल्या पारऱ्या चढून आम्ही बालेकिल्या कडे जाउ लागलो पण अगोदर डाव्या बाजूला असलेली सुवेळा माची, हत्तीचा कडा आणि चिलखती बुरूज पाहायचे ठरवले. उजव्या बाजूला संजीवनी माचीकडे जायला वाट होती. शिवाय जवळच पाली दरवाजा आहे जिथून काही ट्रेकर्स चढाई करतात.
१५ ते २० मिनिटे चालल्यानंतर सर्व प्रथम चिलखती बुरूज लागतो. चिलखती बुरूजावरून समोरच्या दिशेला लांबलचक दिसणारी सुवेळा माची आणि दुरवर पसरलेला वेळवंडी नदीवरील भाटघर डँम दिसतो. किल्ल्याच्या तटबंदीला ठीकठीकाणी लहान दरवाजे (चोरवाटा) बांधलेले आहेत पण त्या छोट्याशा दरवाज्यातून बाहेर पडण्यासाठी समोर मात्र दरीशिवाय कोणताही मार्ग दिसत नाही. चिलखती बुरूजाच्या खालच्या अंगाला एका भला मोठा हत्तीच्या आकाराचा खडक आहे आणि मधोमध भले मोठे छिद्र. त्या छिद्रात चार ते पाच माणसे चढून बसू शकतात एवढी जागा आहे. सुवेळा माचीकडून हा कडा हत्तीच्या आकाराचा दिसतो.
हे सगळे डोळ्यात साठवून परत मागे फिरलो. मागे फिरल्यावर डाव्या बाजूला दूरवर संजीवनी माचीचे दर्शन होते. समोरच बालेकिल्ल्याला जायला एक शॉर्टकर्ट वाट आहे. ती वाट आम्ही पकडली. थोडीशी जंगली झाडाझुडपानी व्यापलेली वाट सहज कोणाच्या लक्षात येत नाही.10 मिनटाच्या बिकट वाटेच्या चढाई नंतर गर्द झाडीत घूसलो आणि समोर पाहतो तर निसर्गनिर्मित खडकांची काटकोनापेक्षाही कमी अंशाची चढण. एवढ्या ट्रेक केल्या मी पण त्यावेळी अंगावर सरकन काटा आला. थंड वातावरणात पण घाम फुटला. मी माघार घ्यायची ठरवले. पण एका मित्राने ती चढाई कशी सोपी आहे हे करून दाखवले. भीतीवर मात करायची असेल तर त्या भीतीलाच कवटाळा. तसेच केले. देवाचे नाव घेवून चढाईला सुरूवात केली. माझे एक एक पाउल निर्णाक ठरत होते. 15 मिनिटे अशी चढाई करून आम्ही 18 जणांपैकी 9 जण हा बालेकील्ला चढून गेलो. आमच्यापैकी बाकीच्यानी अगोदरच माघार घेतली होती. बालेकील्ल्याचा दरवाजा आणि त्याचे बांधकाम विचार करायला लावणारे होते. अजूनही उन ,वारा, पाऊस झेलत जशाचे तसे होते. असे काही पाहीले की सगळा क्षीण निघून जायचा. मनाला एक वेगळीच उभारी यायची. बालेकील्ल्यावर इतिहासकालीन 'सदर' , 'राजवाड्याचे अवशेष' आणि इतक्या उंची वर असणारा नितांत सुंदर छोटा तलाव पाहावयास मिळाला. तिथेच बसून आमच्या शिदोऱ्या सोडल्या आणि तोडांत काहीच घास गेले असतील इतक्यात 15 ते 20 माकडांची गँग आमच्या दिशेने यायला लागली. सारे गुंडाळून तिथून पळावे लागले. पण आमच्यापैकी एकजण त्यांच्या ताबडीत सापडला. मोठा गमतीदार आणि तितकाच धोकादायक प्रसंग होता. त्याने आपल्या जवळचा बिस्कीटचा फेकून घेरावातून सोडवणूक केली. काही वेळ मर्कट लिला पाहून खुप मजा आली. आजूबाजूचा परीसर खुप छान होता. सिंहगडाचे पुसटसे दर्शन होत होते. तसेच बालेकिल्ल्यावरून दिसणारा तोरणा पाहून मनात पुढचा बेत तयार होत होता. आठवणींचे गाठोडे मानाशी ठेवून बालेकिल्लाउतरायला सुरूवात गेली.
काही वेळातच आम्ही चोर दरवाज्याच्या इथे पोहोचलो. आमचे बाकीचे मेंबर्स आमचीच वाट पाहत बसले होते. काही वेळ विश्रांती घेवून राजगड उतरायला सुरूवात केली. तासाभराने 3.15 वाजता पायथा गाठला. सगळे मेंबर्स येईपर्यंत तिथून निघायला 5.30 वाजले. एक यशस्वी एक ट्रेक पुर्ण केल्याचा आनंद सगळ्या ट्रेकर्सचा थकवा दूर करत होता.

हरीश्चंद्रगडाची ट्रेक

04.11.2017
आमच्या ग्रुपची , ट्रेकर्सची पंढरी समजल्या जाणाऱ्या हरीश्चंद्र गडाची ट्रेक जाहीर झाल्यापासून मला जी उत्सुकता लागली होती ती अगदी ट्रेक पू्र्ण करे पर्यंत होती. सह्याद्रीत बरेच ट्रेक केलेले असोत पण हरीश्चंद्रगड केलेला नसेल तर तुमच्या ट्रेकींगला काही अर्थ उरत नाही. म्हणजे १०० कसोटी सामने खेळुनही लॉर्डसवर एकही कसोटी सामना न खेळण्याचं दु:ख जसे एखाद्या क्रिकेटरला बोचत असते तसेच हरीश्चंद्रगड ट्रेक न करण्याचे दु:ख एका ट्रेकरला सतावत असते. त्यामुळेच आमची ही अशी ट्रेक होती की या ट्रेकसाठी कोणीही ऐनवेळी टांग दिली नाही. सह्याद्रीची श्रीमंती एवढी अफाट आहे की आम्हा भटक्यांना गरीबीची कधी जाणीवच होत नाही. युरोप सिंगापुरच्या कृत्रिम झगमटापेक्षा सह्याद्रीचं रांगडं रुप अनुभवण्यातच मला धन्यता वाटते. आणि सह्याद्री अनुभवायचा असेल तर इथे पैशाची श्रीमंती कुचकामी ठरते. इथे हवी शरीराची श्रीमंती. सह्याद्रीत जेवढी गुंतवणुक कराल तेवढी तो दामदुप्पटीने परत करतो.
3 नोव्हेंबरच्या रात्री आम्ही १२ जणांनी शेवटची कसारा लोकल पकडली. यावेळी आमच्या ग्रुप मध्ये ट्रेक लिडर अंकुश,आकाश, रूपेश, कल्पेश, नितेश, विलास, विक्रम, केतन , मंदार, इशान आणि मी एवढे जण होतो. जेवढी थंडी अपेक्षीत धरली होती त्याही पेक्षा जास्त थंडी पडली होती. निद्रादेवीही कडकडीत थंडी बघून नाहीशी झाली. थंडीत कुडकुडत बरोबर ३.१५ ला कसारा स्टेशनला पोचलो. तिथे उतरल्यावर थंडीचे प्रमाण खुपच वाढले होते. गाडी तयारच होती. पटापट गाडी स्वताला कोंबून घेतले. ८ कमफ्रर्टटेबल सीटींग असलेल्या गाडीत १२ जणांनी बसायचे धाडस जोरदार पडलेल्या थंडीमुळे सहजशक्य झाले. कसारा ते शिर्डी फाटा पर्यंतचा रस्ता सहज पार झाला पण पुढचा प्रवास खुप वाईट होता. चालू वर्षी भरपूर झालेल्या पावसामुळे रस्त्याची हालत खड्ड्यात रस्ता अशी झाली आहे. कसारा ते खिरेश्वर या हरीश्चंद्रगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावातील अवघे १०० कीमी आहे. पण आम्हाला पोहोचायला साडेचार तास लागले. तिथे फ्रेश होवून चहा आणि कांदेपोह्याचा कार्यक्रम पार पडला झाला. चहा आणि पोह्याचे पँकेज प्रत्येक व्यक्तीला ५० रूपये प्रमाणे होते. गरमागरम घरगुती पोह्याचे घमेले आमच्या समोर आले शिवाय पाहीजे तेवढे घ्यायची ही मुभा. कांदेपोहे महाग वाटले तरी प्रत्येकाने ५० रूपये वसूल केले. मी तर तीन वेळा कांदेपोहे घेवन उच्चांक केला. भरपेट नाष्टा करून सगळे मावळे निघालो.
हरीश्चंद्र गडावर जायला तीन वाटा आहेत. गड सर करण्यासाठी एक सावर्णे-बेलपाडा-साधले असा घाटमार्ग आहे. परंतु हा मार्ग फारच अवघड असल्याने प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असलेल्यांनीच हा मार्ग अवलंबावा. या मार्गे येण्यासाठी कल्याण-मुरबाड मार्गे माळशेजघाट चालू होण्यापूर्वी सावर्णे गावात उतरावे. येथून `बेलपाडा' या कोकणकड्याच्या पायथ्याच्या गावात यावे. येथून कड्यातून काढलेल्या साधले घाटाच्या साहाय्याने कोकणकड्याच्या पठारावर जाता येते. या वाटेलाच `नळीची वाट' असेही म्हणतात.
हरिश्चंद्रगडावर जाण्याची एक वाट पाचनई मार्गे अहमदनगर जिल्ह्यातूनही आहे. यासाठी मुंबई-नाशिक हमरस्त्यावरील घोटी या गावी उतरावे. तिथून संगमनेर मार्गावरील राजूर या गावी जावे. राजूरवरून गडावर दोन मार्गांनी चढाई करता येते.
तिसरी म्हणजे खिरेश्वरकडील वाट सोपी असल्याने लोक हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी साधारणपणे ही वाट घेतात.
आम्हीपण खिरेश्वरकडील वाट पकडली. खिरेश्वर पायथा ते हरीश्चंद्रेश्वराचे मंदीर ही ट्रेक फारशी कठीण नाहीये. सुरूवातीची चढण दमछाक करणारी आहे. काही धोकादायक ठीकाणी लोखंडी रेलींग लावल्या असल्याने सोपे होते. कातळाकड्याच्या बाजूनी जाणारी वाट रूंद असल्यामुळे बाजूची पुर्णपणे कातळी, निरसडी आणि नजर न पोहोचणाऱ्या खोलाई असलेल्या दरीची भीती वाटत नाही. पुढे कातळकड्याला वळसा घालून गेल्यावर एक ओढा लागतो तो ओलांडला की पुढे थोडे जंगल पार करावे लागते आणि ते पार केले की हरीश्चंद्रगडाचे पठार दिसते. हे अंतर चढायला आम्हाला दोन तास लागले. ग्रुप असला की सगळ्यांना सांभाळत ट्रेकींग केले जाते. शिवाय या ठिक ठिकाणावर लांबलचक फोटोसेशन घेण्यात आले. उभा, बसुन, झोपुन, आडवे पडुन, मांडी घालुन, इकडे बघताना, तिकडे बघताना. काही विचारु नका. फोटोची हौसमौज करुन घेतली. जीवाची मुंबई करुन घेतली. म्हातारपणी भाव खायला हे फोटो खुप उपयोगी पडतील. मोबाईल टेक्नॉलॉजीने फोटोवरचा खर्च एकदम शून्य करुन टाकला आहे. १०-१२ वर्षापुर्वी एवढे फोटो काढण्याचा कोणी विचारही केला नसता. न थांबता ट्रेक केले तर एक ते दिड तासामध्ये मंदीर गाठू शकतो असतो.
पठारावरील काळ्या दगडातील हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर पाहून सगळा क्षीण निघून गेला. हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दारात एक पुष्करणी आहे. त्यामधील कोनाड्यांमध्ये पूर्वी मूर्ती होत्या. मंदिराच्या समोर नंदी आहे. साधारण दहाव्या अकराव्या शतकात झांज राजाने बांधलेल्या १२ मंदिरांमधील हे मंदिर आहे. मंदीराच्या आवारात काही गुहा राहाण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार व अमृततुल्य आहे. मंदिराच्या मागे असणाया गुहेमध्ये एक चौथरा आहे. या चौथर्‍यात जमिनीखाली एक खोली आहे. यावर प्रचंड शिळा ठेवली आहे. या खोलीत 'चांगदेव ऋषींनी' चौदाशे वर्ष तप केले होते असे स्थानिक गावकरी सांगतात. दगडात कोरलेली जागेत विठ्ठल रुख्मणी मंदीर आणि महाविष्णू सिद्धमंदीर डोळ्याचे पारणे फेडून जातात.
मंदिराच्या उत्तरेकडे पाण्याच्या प्रवाहाने झालेली धळ आहे. या धळीमध्ये केदारेश्वराची लेणी आहे. यामध्ये भलीमोठी पिंड आहे. पिंडीच्या बाजूला पाणी भरलेले असते. प्रदक्षिणा मारता येते.
तारामती शिखराच्या उत्तर पायथ्याला लेणी कोरलेली आहे. ती पाहण्यासारखी आहेत.
हरीश्चंद्र किल्ल्याचे सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे गडाच्या पश्चिमेकडे असलेला कोकणकडा. ते आकर्षणच आम्हाला इथपर्यंत घेवून आले होते. आम्ही मंदीरापासून २० मिनिटामध्ये कोकणकड्यावर पोहोचलो. तीन हजार फूट खाली कोकणात कोसळणारा हा कडा मध्यभागी जवळजवळ ७५ फूट अंतर्वक्र आहे. कड्याच्या माथ्यावर झोपूनच (आणि जपूनच) याचे विराट रूप पहावे लागते. स्वच्छ हवा असली तर येथून कल्याणपर्यंतचा प्रदेश दिसतो. हा कडा महाराष्ट्रातील सर्वांत उंच कडा आहे. हा कडा रोमन लिपीतील यू 'U' या अक्षराच्या आकाराचा आहे. हा इतर कड्यांसारखा ९० अंशात नसून अंतर्गोल आकाराचा आहे. समोरून बघितला तर नागाच्या फण्यासारखा दिसतो.
कोकणकड्यावरून आमचा पाय निघता निघत नव्हता. तिथून निघालो तेव्हा दुपारचे दोन वाजले होते. पोटपूजा झाली होतीच. अंगाला सुखद थंडगार स्पर्श करणारा भन्नाट वारा उन व जागरणाचा त्रास जाणवू देत नव्हता. कोकणकडा ते तारामती शिखर अंतर फारसे नाहीये पण काळजाचा थरकाप उडवणारी दरी, निमुळती वाट आणि दोन शिड्यांपैकी एक डगमगणारी शिडी शिवाय दाट जंगली रानातील तीव्र चढण आम्हाला खुपच आव्हानात्मक वाटली. दोन तीन रिस्की पॉईंट पार करून तारामती शिखरावर पोचलो खरे पण शिखरावर असणाऱ्या झेंड्याकडे पोचताना एका ठीकाणी निमुळत्या वाटेवरून जाताना थंड सोसाट्याच्या वाऱ्याने आम्ही ढकलले जावू लागलो. आमचे एक चुकीचे पाऊल खोल दरीत पडायला कारणीभुत ठरले असते. वारा थांबायचे नाव घेत नव्हता. शेवटी पाठीवरची बँग पुढे घेवून खाली बसत बसत ती चार फुटाची कठीन वाट पार केली आणि खऱ्या अर्थाने दोन नंबरचे शिखर सर केले.
तारामती शिखर हे महाराष्ट्रातील कळसूबाई नंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर आहे. उंची साधारणतः ४८५० फूट्.. शिखराच्या पोटात एकूण सात लेणी आहेत. त्यापैकी एका गुफेत गणेशाची सुमारे साडेआठ फुटाची भव्य आणि सुंदर मूर्ती आहे. याच गणेशगुहेच्या आजूबाजूला अनेक गुहा आहेत. त्यातही राहण्याची सोय होते. या शिखरावरून समोरच दिसणारे जंगल, घाटावरचा आणि कोकणातील प्रदेश न्याहाळता येतात. शिखरावर जाताना वाटेत अनेक गोमुखे लागतात. माथ्यावर दोनतीन शिवलिंगे आहेत. तसेच शिखरावरून पिंपळजोगा धरण आणि माळशेज घाटही दिसतात. शिखराच्या माथ्यावर काही काळ थांबून आम्ही मंदीराच्या बाजूने खाली उतरायला सुरूवात केली. एक टप्पा उतरल्यावर अशा एका ठीकाणी आलो की तिथे भीती काय असते आणि भीतीने गाळण कशी उडते याचा अनुभव आला. थंड वातावरणात सुद्धा घाम कसा फुटतो याचा प्रत्यय आला. उतरायला फुटभर रुंदीचे तीन दगड, बाजूला ४००० फुट खोल दरी. पाय शक्य तेवढे स्थिर ठेवले. पाय ठेवायला हजारदा विचार करायला लावणारा क्षण. देवाचे नाव घेवून दगडावर विश्वास ठेवून उतरायला सुरूवात केली. दगड कधी विश्वासघात करत नाही पण त्या खालची माती त्याला तसं करायला भाग पाडत असते. या ठीकाणी दगडांना एकाच बाजूला माती होती. त्या बाजूने दगा दिला असता तर.. हा लेख तुमच्या पर्यंत आला नसता. पण म्हणतात ना डर के आगे जीत है.. तसच झालं. गंमत म्हणजे खाली उतरल्यावर कळले या वाटेहून सोपी वाट दुसऱ्या बाजूला होती. आम्ही बाकीच्या मित्रांना ती वाट दाखवली. तिथून तासाभरात पायथ्याशी पोचलो. सगळेच दमले असल्यामुळे फोटोसेशन न होता पटापट खाली उतरलो. यथेच्छ जेवन ( unlimited जेवन जे आम्हाला जेवनाच्या बुफे पद्धतीमुळे मिळाले) करून बरोबर ५.१५ कसाऱ्याकडे कूच केली आणि ९ वाजता कसारा स्टेशन पोहोचलो.

कोथळीगड - पेठ कील्ला..

कोथळीगड - पेठ कील्ला..
२६.११.२०१७
गडावरच्या प्रत्येक पावलावर इतिहास कोरून ठेवलाय,या सह्याद्रीचा प्रत्येक दगड इतिहासाचा भाग आहे. आज परत एकदा सह्याद्रीच्या कुशीत जायचा योग आला.
पण यावेळचा योग थोडा वेगळा होता. यावेळी बाईक स्वारी होती. माझ्यासाठी हा अनुभव नवीन होता. पण माझ्या मित्रांनी तो जुळवून आणला आणि मी , मिलिंद , विनायक आणि हेरंब असे चार जण निघालो कोथळीगड सर करायला. आम्हाला त्या ठिकाणीबद्दल काहीच माहीती नव्हती पण तिथे गेल्यावर एक सुखद आठवण मात्र घेवून आलो.
भल्या सकाळी ६ वाजता थंडीतून आम्ही निघालो तेव्हा थंड झोंबणारा वारा आणि बाईक स्वारी मनाला सुखावत होती. रस्ता बऱ्यापैकी चांगला होता. बदलापुरहून निघाल्यावर नेरळ पश्चिम वरून कशेळे कडे जाणारा रस्ता पकडला. कशेळे ते आंबवली हा रस्ता फारच सुबक आणि छान आहे.
साधारणपणे ८.१५ आम्ही आंबवली गावात पोहोचलो. तिथून पेठ गावाकडे जाणारा रस्ता सुरूवातीला बरा होता पण १ किमी आत गेल्यावर तीव्र चढण, रस्त्यापासून सुटलेले दगड, माती यामुळे आम्हाला आमच्या बाईक्स मध्येच सोडून जावे लागले. या रस्त्यावरून पुढे बाईक्स गेल्याच्या खुणा होत्या. शिवाय गावात जाऊन असे समजले की त्याच रस्त्यावरून गावातली लोक ट्रिपल सीट घेवून बाईकने प्रवास करतात. धन्य ते गावकरी. बाईक्स पार्क करून आम्ही चालत सुटलो. चढाईचा पूर्ण रस्ता दमछाक करत होता. सकाळची वेळ असल्यामुळे घाम निघत नव्हता. तासाभराची चढण पार केल्यावर आम्ही 'पेठ' गावात पोचलो. समोर दिसणरा कोथलीगडाचा सुळका आम्हाला खुणावू लागला. थोडी विश्रांती करून चढाईला सुरूवात केली. गडाच्या पायथ्याशी ‘पेठ‘ हे गाव आहे या गावाहून वर गडावर चढण्याचा मार्ग दमछाक करणारा आहे. पण वाटेवरील करवंदांची आणि चाफ्याची झाडे ही वाटचाल सुखावह करतात. ठीकठिकाणी सापाच्या कातही पाहायला मिळते. ही वाट सरळ किल्ल्याच्या प्रवेशव्दाराशी घेऊन जाते. या चढाई दरम्यान घरून नेलेले कांदे पोहे आणि उपमा या पदार्थानी नाष्टाला लज्जत आणली. आम्हाला गडावर पोचायला १ तास लागला. गडावर गावातली छोटी मुले सरबत विकताना दिसतात. परिस्थितीपुढे आणि निसर्गापुढे हात न टेकता अगदी सहजरित्या ही मुलं गड चढतात आणि सरबत विकण्याचे काम करतात. त्यांचे निरागस चेहरे बघून आपल्याला सरबत विकत घेण्यापासून राहवत नाही. खुप कष्ट करतात ही मुलं.
गडाच्या द्वारापाशी पोहचल्यावर गुहेजवळच एका ऊर्ध्वमुखी भुयारात किल्ल्याच्या सुळक्यावर जाण्यासाठी व्यवस्थित पायर्‍या कोरलेल्या आहेत. दगडातील अप्रतीम कोरीव काम गड चढताना आलेला सगळा क्षीण दूर करते. पायऱ्यांवरून जाणारा मार्ग एक दोन ठिकाणी खुपच धोकादायक आहे. अरूंद पायऱ्यांची वाट आणि बाजूला खोल दरी नवगिर्यारोहकाला काळजात धडकी भरवल्याशिवाय राहत नाही. गडाचे बांधकाम अजूनही सुस्थितीत आहे.
पायर्‍यांच्या मार्गावर उजवीकडे गज शिल्प कोरलेले आहे. पायर्‍यांच्या शेवटी दगडात कोरून काढलेला दरवाजा आहे. त्यावर शरभ शिल्प आहे. गडमाथ्यावर पाण्याची दोन टाकी आहेत. गडमाथ्यावरुन भीमाशंकरकडील कलावंतिणीचा महाल, नागफणी, वाघाचा डोळा, सिद्धगड, कल्याणकडील हाजीमलंग, चंदेरी, प्रबळगड, इर्शाळगड, माणिकगड, माथेरानचे पठार हा विस्तृत मुलूख नजरेच्या टप्प्यात येतो. एका बाजूला वाऱ्यासोबत फिरत असलेल्या पवनचक्क्याही दिसतात.
गडमाथ्यावरुन परत गुहेजवळ येउन सुळक्याला प्रदक्षिणा घातलताना वाटेत पाण्याच्या टाक्यांचे दोन समुह व एक लेण पाहायला मिळते. याशिवाय गडावर प्रवेशव्दाराच्या उजवीकडे खाली उतरल्यावर तसे गावात मारुती मंदिरा जवळ सप्तधातूनी बनवलेली तोफ पाहायला मिळते.
साधारणपणे ११.३० आम्ही गड उतरायला सुरूवात केली आणि तासाभरात पेठ गावात येउन एका सुंदर झोपड्यात जेवन केले. तिथून परत १ तासाची उतरण पार करत जिथे बाईक्स पार्क केल्या होत्या तिथे आलो. आणि परतीचा प्रवास सुरू झाला.
गडाचा इतिहास..
कोथळीगड हा कर्जतपासून ईशान्येला साधारण २१ किमी अंतरावर आहे. राजमाची आणि ढाक किल्ल्र्‍यांच्या आणि सिध्दगड, भीमाशंकरच्या अलीकडे दाट झाडीतून आपला उत्तुंग कातळकडा उभारून हा किल्ला इतिहासाची साक्ष देत उभा आहे.
औरंगजेबाने नोव्हेंबर १६८४ मध्ये अब्दुल कादर व अलईबिरादरकानी र्‍यांना संभाजींच्या ताब्यातील किल्ले घेण्यासाठी पाठवले. ’कोथळागड’ हा महत्त्वाचा असून जो कोणी तो ताब्यात घेईल, त्याचा ताबा तळकोकणावर राहील हे लक्षात घेऊन अब्दुल कादर याने हा किल्ला घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तो या किल्ल्याच्या जवळपास गेला आणि तेथे राहणार्‍या लोकांना त्याने आपले नोकर म्हणून ठेवून घेतले. मराठे या किल्ल्यातून शस्त्रांची नेआण करतात, हे कळताच अब्दुल कादर व त्याचे ३०० बंदूकधारी नोव्हेंबर १६८४ मध्येच गडाच्या पायथ्याशी पोहोचले. मराठ्यांनी त्र्‍यांना मागे हटवले, पण तरीही काही लोक किल्ल्याच्या मगरकोट दरवाज्याजवळ पोहोचले आणि त्यांनी ‘दरवाजा उघडा‘ अशी आरडाओरड सुरू केली. किल्ल्यावरील मराठा सैन्याला वाटले की आपलेच लोक हत्यारे नेण्यासाठी आले आहेत, म्हणून त्यांनी दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच मोगल सैनिक आत शिरले मराठे व मोगल र्‍यांच्यात लढाई झाली. अब्दुल कादरच्या मदतीसाठी माणकोजी पांढरेही आले, झालेल्या लढाईत मोगलांना यश आले.
दुसर्‍याच दिवशी मराठ्यांनी किल्ल्याला वेढा घातला, फार मोठी लढाई झाली. या लढाईत बाणांचा व बंदुकींचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला.या लढाईत किल्ल्यावरचा दारूगोळा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. गडावर जाणारी सामुग्री मराठ्यांनी लुटल्यामुळे मुघल सैन्याला दारूगोळा व धान्य मिळेनासे झाले. दरम्यानच्या काळात अब्दुल कादरच्या मदतीला कोणीच न आल्यामुळे त्याची परिस्थिती कठीण झाली. वेढा टाकल्यानंतर दहा बारा दिवसांनी जुन्नरचा किल्लेदार अब्दुल अजिजखान याने आपला मुलगा अब्दुलखान याला सैन्यासह अब्दुल कादरच्या मदतीला पाठवले. अब्दुलखान तेथे पोहचला तेव्हा त्याची वाट अडवण्यासाठी मराठ्यांचा सरदार नारोजी त्रिंबक र्‍यांनी तेथील खोरे रोखून धरले होते. येथेही लढाई झाली नारोजी त्रिंबक व इतर सरदार धारातीर्थी पडले आणि कोथळागड मुघलांच्या ताब्यात गेला. इहमतखानाने नारोजी त्रिंबकाचे डोके रस्त्यावर टांगले किल्ला जिंकून सोन्याची किल्ली औरंगजेबाकडे पाठवण्यात आली. औरंगजेबाने कोथळागड नावाचा असा कोणता गड अस्तित्वात आहे का? याची खात्री करून मगच अब्दुलखानाला बक्षिसे दिली. मुघलांनी गडाला ‘मिफ्ताहुलफतह‘ (विजयाची किल्ली) असे नाव दिले. फंदफितुरीमुळे मराठ्यांच्या हातून हा मोक्याचा किल्ला निसटला.
गड परत मिळवण्यासाठी मराठ्यांनी प्रयत्न सुरू केले. डिसेंबर १६८४ मध्ये गडाकडे जाणार्‍या मुघल सैन्याला मराठ्यांनी अडवले. नंतर मऱ्हामतखानालाही ७००० मराठ्यांच्या तुकडीने अडवले. पण मराठ्यांना यश लाभले नाही. त्यानंतर एप्रिल १६८५ मध्ये ७०० जणांच्या तुकडीने पुन्हा हल्ला केला. २०० जण दोरीच्या शिडीच्या मदतीने किल्ल्यात उतरले. बरेच रक्त सांडले, पण मराठ्यांची फत्ते होऊ शकली नाही. मराठ्यांनी हा महत्त्वाचा किल्ला गमावला होता. पुढे १८१७ च्या नोव्हेंबरमध्ये दुसर्‍या बाजीराव पेशव्याच्या वतीने बापुराव नामक शूर सरदाराने हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यातून सोडवला. सुमारे १८६२ पर्यंत किल्ल्यावर माणसांचा राबता होता.
पहाण्याची ठिकाणे :पायथ्याजवळच्या पेठ गावातून चहुबाजूंनी तासल्या सारखा पेठचा सुळका दिसतो. पायवाटेने वर पोहोचल्यावर पायर्‍यांचे व प्रवेशव्दाराचे अवशेष दिसतात. पुढे कातळाच्या पोटात खोदलेल्या गुहा दिसतात. प्रथम आहे ती देवीची गुहा, पाण्याचं टाके आणि मग डावीकडे ऐसपैस अशी भैरोबाची गुहा. या गुहेचे वैशिष्ट्य म्हणजे सपाट, समतल भूमी आणि छताला आधार देणारे कोरीव नक्षीदार खांब. गुहेत ४५ ठिकाणी गोल खळगे आहेत आणि काही जूने तोफेचे गोळे आहेत.
पोहोचण्याच्या वाटा :१)कर्जतहून एस्‌टी ने कशेळे मार्गे आंबिवली या गावात जावे. हे अंतर साधारण ३० किमी आहे.
२) नेरळहून येताना कशेळे या गावी यावे आणि जामरुखची एस्‌टी पकडून आंबिवली गावात यावे.
राहाण्याची सोय : भैरोबाच्या गुहेत २० - २५ जण व्यवस्थित राहू शकतात.
पाण्याची सोय :- गडावर बारामाही पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत.
जाण्यासाठी लागणारा वेळ :- आंबिवली गावापासून २ तास लागतात, तर पेठ गावापासून १ तास लागतो.
कधी वेळ मिळाला तर या किल्ल्याला नक्की भेट द्या.
शब्दांकन :- नितीन राणे ( कणकवली )
९००४६०२७६८.

ढाक बहीरीचा थरार..

ढाक बहीरीचा थरार....

09.12.2017

राजगडचा बालेकिल्ला चढताना माझा मित्र अंकुश मला बोलला होता. आपण एकदा ढाक बहीरीला जाऊ. तिथपासून मनात होतचं. यु ट्युबवरील व्हीडयो पाहून मनाची तयारी होत नव्हती. शेवटी योग जुळून आला. आम्ही बँगा भरल्या. सकाळी लवकर निघायचे ठरले. अंकुश कांजूरमार्ग वरून येणार होता. मी आणि इतर दोन मित्र बदलापुर हून जाणार होतो. मी, अंकुश, मिलिंद आणि विकी असे चौघेजण होतो. सकाळी ६.३० वाजता बाईक काढल्या, बोचरी थंडी आणि दुलई पांघरलेले धुकं. आमचा वेग कमी करत होती. धुक्यातून बाईक राईड म्हणजे पर्वणीच. पाच दहा मिनटातच सगळे अंग पांढऱ्या दवबिंदूनी घेरले गेले. डोळ्याच्या पापण्यावरील दवबिंदू तर अवर्णनीय दिसत होते. बदलापूर ते कर्जत या तासाभराच्या अंतरात आम्ही दवबिंदूनी भिजून गेलो. कर्जतला चहा नाष्टा घेवून सांडशी या गावाकडे प्रस्थान केले. तिथून साधारणपणे पाऊन तासात सांडशी गावात पोचलो. गावात पोहोचल्यावर धुकं बरेचसे गायब झाले होते. सुर्यदेव हळहळू डोकावू लागले होते. गावातून दिसणारा ढाक बहीरी लेण्याच्या बाजूचा कडा नजरेत भरत होता. त्या कड्या बाजूलाच बहीरी लेणी असतील असं आम्हाला बिलकुल वाटले नव्हते. अत्यंत कठीण श्रेणीच्या ट्रेकची सुरूवात ९ वाजता झाली. गंमत अशी की सुरूवातीलाच आम्ही रस्ता चुकलो , लेण्यांकडे जाणारी डोंगराकडील वाट सापडत नव्हती. आदीवाशी पाड्याकडून उजवीकडे न जाता आम्ही डावीकडे वळलो होतो. तिथेच चुकलो होतो. रस्ता चुकल्यामुळे जिथून सुरूवात केली तिथेच परत आलो. इतक्यात चार पाच जनांचा एक ग्रुप आमच्या दिशेने येताना दिसला. त्यांच्यासोबत आदीवाशी पाड्यातील एक वाटाड्या होता. त्यांना आमच्या पुढे जाऊ देत काही अंतर मागे राहत मागोमाग चालत राहीलो. १५ ते २० मिनिटे
चालल्यावर तीव्र चढण सुरू होते. ही चढण तीन टप्प्या मध्ये म्हणजेच तीव्र चढणीचे दोन डोंगर पार करून तिसऱ्या टप्प्यात कडा पार करुन लेण्या पर्यंत पोहोचता येते.
आमचा पहीला टप्पा खुपच दमछाक करणारा ठरला. कडक उन आणि तीव्र चढणीमुळे लवकर दमायला होत होतं. त्यामुळे वेळही लागत होता. काही ठीकाणी वाटेतील दगडामुळे घसरायला होत होते. जस जसे वर जात होतो. तसतशी बाजुची दरी खोल आणि भीषण वाटत होती. खरतर अशा प्रकारची वाट माझ्या आवडीची. छान वाटते. सुरूवातीला भीती वाटायची, आता नाही. पहीला टप्पा पार करायला सुमारे दिड तास खर्ची करावा लागला. थोडी सपाट वाट आली तसं बरं वाटले पण तेही काही क्षण टिकले. परत चढण सुरू झाली. समाधानाची गोष्ट म्हणजे ही चढण राजमाचीच्या घनदाट निबीड जंगलातून होती. त्यामुळे सावली आम्हाला वरदान ठरू लागली. पक्षांचे वेगवेगळे आवाज आमचे मनोरंजन करू लागले. दुसरा टप्पा जरी खतरनाक चढणीचा असला तरी बाजूला दरी नव्हती आणि डोक्यावर उन ही. एका ठीकणी एक मुलगा जंगलात औषधी मुळ्या शोधताना आढळला. त्याच्या म्हणण्यानुसार घनदाट जंगलात अशा बऱ्याच औषधी प्रकारच्या मुळ्या होत्या.
दुसरा टप्पा पार करायला १ तास लागला. चढण संपून जेव्हा थोडा सपाट प्रदेश लागला तेव्हा हायसे वाटले. एक ठिकाणी दगडातील दिपस्तंभ आढळला. तिथेच एका पाषाणी दगडाच्या बाजूला पाच सहा लोखंडी त्रिशुल दिसली. आजुबाजूची जागाही स्वच्छ दिसत होती. तिथे एका प्रकारचा शांतपणा वाटला.
आता इथून खरी कसोटी होती. परत एकदा घनदाट जंगलातून जीवघेणी चढण सुरू झाली. थोड पुढे गेल्यावर बहीरी लेण्याच्या कड्यातला चिर दिसला. सोबत भगवा झेंडा आणि कड्यावरून खाली लोंबणारा पांढरा दोर. हे सगळे बघुनच काळजात धस्स झाले. ते आमचे फायनल डेस्टिनेशन होतं. एवढं भयानक चित्र नजरे समोर होतं. मनातून भीती वाटत होती. पण तिथे उत्सुकता देखील होती. थोडा वेळ दाट जंगलातील चढण पार केल्यावर पुढे जंगल संपलं. नजरे समोर आ वासला तो भयानक कडा आणि कड्यातील चिर. तो आता मोठा दिसू लागला. अजून कड्या पर्यंत जायला बरीच धोकादायक चढण पार करायची होती. धोकादायक अशा साठी बोलतोय की, चढणीची वाट म्हणजे पावसाची पाणी वाहून जाण्याची जागा होती. वाटेत कमालीचा उंच सखलपणा होता. चालताना पायाखालचे दगड घसरत होते. पुढे बघायची सोय नव्हती. समोरचा भयानक कातळी कडा मनात धडकी भरवत होता. मनात घालमेल चालूच होती. आपण जेवढे चढलोय तेवढेच उतरायचे देखील आहे. कड्याच्या मुळात पोहचायला आम्हाला बराच वेळ लागला. आमच्यातील एकाने याच ठीकाणी आपली ट्रेक संपवली. आम्ही तिथे पोचलो तेव्हा आमच्या पुढे असणारा एक ग्रुप चढण्यासाठी स्ट्रगल करताना दिसला. त्यांनी आपली पादत्राणे खाली काढून ठेवली होती. कदाचित त्यांना त्यांच्या शुजवर विश्वास नसावा. हा कातळी कडा अंदाजे १२० फुटाचा असावा. लेण्याच्या प्रवेश द्वारापासून खालपर्यंत एक दोर लटकत होता. हा कडा तीन टप्प्यात पार करायचा होता. देवाचे नाव घेऊन पहीला टप्पा चढायला सुरूवात केली. तो चढताना सुरूवातीला जेमतेम एक पाय राहील एवढ्या आकाराच्या दगडात कोरलेल्या खाचा होत्या. एका हाताने दोरीला पकडत हळूहळू चढू लागलो. सगळ्यात पुढे अंकुश, नंतर मी आणि शेवटला मिलिंद. ते चढल्यानंतर एक वेळ अशी आली की लोखंडी सळीला पकडून एक मोठ्या दगडातून वर चढायचे होते. इथून मात्र मला परत खाली जावसं वाटले. अंकुशने तो पँच पार केला होता. माझा धीरच होत नव्हता. छोटीशी एक चुकी मला सरळ दरीत घेवून जाणारी होती. सगळी हीम्मत एकटवत वरच्या दगडी खाच्यात पाय ठेवला. एका हाताने दोरीला पकडत अक्षरक्ष झोपून स्वताला वरच्या दिशेला झोकून दिलं. मी हे केलं यावर माझा विश्वास बसेना. एक टप्पा पार केला होता. इथेच एक संगमरवरी दगडात कोरलेल्या पादुकांची फरशी बसवलेली आहे. त्या पादुका कोणाच्या त्या बद्दल काही माहीती मिळाली नाही.
दुसरा टप्पा थोडा कमी रिस्की होता पण एका हाताने लोखंडी सळी पकडत कड्याच्या कपारीत पाय ठेवून हळूहळू वर सरकायचे होते. वर भैरोबा होताच. त्याकडे एकदा बघून तेही पार केले. हे सगळे करत असताना मागे वळून खाली बघायची हीम्मत काही माझी झाली नाही.
आता सर्वात कठीण टप्पा पार करायचा होता. विजय समीप होता. हा सरळसोट कडा चढायला शिडी देखील लावणे कठीण होती. १० फुटाचे हे अंतर पार करणे आव्हानात्मक होतं. इथे एका झाडाचे खोड उखळीत बसवले आहे. खोडाच्या खालच्या बाजूला लोखंडी सळीने बांधले असल्यामुळे जास्त खोल नसलेल्या उखळीतून झाडाचे खोड निसटण्याची शक्यता कमीच होती. हे काळे तुळतुळीत, टणक खोड कोणत्या झाडाचे आहे हे मात्र कळले नाही. त्याची वरची बाजू मोकळी असल्याने आपल्या वजनाने ते सहजपणे झुलते. त्याच्या छाटलेल्या फांद्यांचा आधार शिडीसारखा चढायला होतो. थोडक्यात हे उंचावर जावून रतांब्याच्या झाडावर चढण्यासारखे होते. बाजुला एका हाताने दोर आणि लोखंडी सळीचा आधार घेत सुरक्षेची साधने नसतील तर निव्वळ आणि निव्वळ देव आणि नशिबावर विसंबून चढावे लागते. पु्र्णपणे लक्ष केंद्रीत करून ही चढाई करावी लागते. यात माकडे व्यत्यय आणू शकतात. आमच्या एका सहकाऱ्याच्या बाबतीत असचं झालं तो चढत असताना एक माकड अगदी जवळ आलं होतं. झाडाच्या खोडाचा अंदाज घेतल्यावर असं लक्षात आलं की खोड आणि फांद्या लोखंडा इतक्याच मजबूत होत्या. ( त्या झाडाच्या खोडाचा फोटो काढणे खुपच कठीण होतं त्यामुळे त्याचा फोटो काढता आला नाही.) पायावर विश्वास ठेवत एक एक फांदी पार केली. शेवटच्या फांदीवर एक पाय ठेवत दुसरा पाय लेण्याच्या भागावर ठेवला, आणि आम्ही सर्वात कठीण ट्रेक पुर्ण केली होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर जिंकल्याचा आनंद ओसंडून वाहत होता. सुमारे चार तासानंतर हे साध्य झालं होतं. बरोबर एक वाजता आम्ही वर पोचलो होतो. आता मागे वळून पाहायला काहीच हरकत नव्हती. खाली पाहीले तर डोकं गरगरायला लागलं. अगदी खाली वाकून बघीतलं तरच आम्ही वर चढलो ती वाट दिसत होती. यावरून कड्याची चढण लक्षात येऊ शकते.
बहीरीच्या या लेण्यात बहिरोबाचे ( भैरोबा ) मंदिर आहे. तसेच या बहिरीच्या गुहेत बहिरीचा शेंदुर फासलेला दगड आहे. बहिरीची ही गुहा चांगली वीसेक मीटर लांब, सहा-सात मीटर रुंद आणि तीन ते चार मीटर उंच आहे. ठाकरांचा आकर उकार नसलेला शेंदुर फासलेला नवसाला पावणारा अनगड देवही या गुहेत बसला आहे. एवढय़ा उंच कातळातही पाण्याने काठोकाठ भरलेल्या दोन टाक्या आहेत. पाण्याची चव अप्रतिम आहे. या टाक्यांमध्येच गावकऱ्यानी जेवणासाठी काही भांडी ठेवली आहेत. जेवण झाल्यावर ही भांडी धुवून पुन्हा या टाक्यातच ठेवली जातात. ही भांडी चोरली तर बहिरी कड्यावरुन ढकलुन देतो. असे बोलले जाते. त्यामुळे तेवढं धाडस अजुन कोणी केलेलं नाही म्हणून भांडी अजुन शाबुत आहे.
डोंगरदरीत राहणारे आदिवासी ठाकर ही दुर्गम वाट चढून वर येतात. पूजाअर्चा-नैवेद्य करतात दिवस मावळायच्या आत खाली उतरतात. ढाकच्या बहिरिला कोबड्याचा बळी दिला जातो.
ढाकच्या भैरोबा विषयी जास्त माहिती मिळत नाही. पण एक विशेष गोष्ट कळली ती म्हणजे हा बहिरी फार रागीट आहे. याला‘ स्त्री’ येथे आलेली चालत नाही, असे म्हणतात की तो आलेल्या स्त्रीला पाताळस्पर्शी दरीत ढकलून देतो. म्हणून येथील गावकरी स्त्रियांना ढाक बहिरीवर जाण्यास मनाई करतात. पण हे कितपत खरे आहे यावर अजून शंका आहे. कारण 25 वर्षा पूर्वी येथे आदिवासी महिला पुजारी होती.
गुहेच्या वर दीड हजार फूटांची कातळभिंत आहे. इथून आजूबाजूच्या निसर्गाचे घडणारे दर्शनही फार विलोभनीय आहे. गुहेच्या समोरच राजमाचीचे श्रीवर्धन आणि मनरंजन हे दोन बालेकिल्ले दिसतात. येथूनच नागफणीचे टोक , प्रबळगड , कर्नाळा, माथेरान असा विस्तीर्ण परिसर दिसतो. दुसर्या लेण्यात काहीही अवशेष नाहीत ,तर ३ रे लेणे अर्धवट खोदलेल्या स्थितीत आहे. लेण्याच्या एका टोकाला एक मोठा कळकराय नावाचा सुळका आहे. कळकरायच्या सुळक्यावर चढाई करण्यासाठी अनेक गिर्यारोहक इथे येतात. बहीरी लेण्याकडे येण्यासाठी पुण्याकडून याच सुळक्याच्या बाजूने एका घळीतून यावे लागते.
सहय़ाद्रीच्या रांगेतील हे नवल तसे अनेक वर्षे एक गुपित होते. ढाकच्या बहिरीचा हा चढउताराचा थरार या रहाळातील ठाकरांपुरताच होता. पण आज सहय़ाद्रीत भटकणारा प्रत्येक गिर्यारोहक एकदा तरी या ढाकच्या वाटेला भिडतो आणि या गुहेतून आमच्याच राकट देशाचे दर्शन घेतो.
असेच आम्ही दर्शन घेऊन दिड वाजता खाली उतरायला सुरूवात केली. उतरताना पण खुप काळजी घेऊन उतरायला लागत होते. एक चुकीचं पाऊल दरीत घेऊन गेलं असतं. कडा उतरून झाल्यावर एकवार लेण्याकडे बघून आम्ही खाली उतरायला सुरूवात केली. सुमारे १ तास उतरल्यावर सुंदर घनदाट जंगलात वनभोजनाला बसलो. मिलिंदच्या घरून आणलेल्या इडली, आंबोळ्या, चटणी आणि काळ्या वाटाण्याच्या सांबाऱ्यावर यथेच्छ ताव मारला. तिथून निघालो तेव्हा २.३० वाजले होते. ४ वाजता सांडशी पोचलो. थोडा आराम करून थरारक आठवणी मनात ठेवत परतलो.
जगदंब...
शब्दांकन - नितीन राणे ( कणकवली )
९००४६०२७६८

ट्रेक गोरखगडाची

ट्रेक गोरखगडाची...
आमचा सगळ्यात जलद कोणता प्लान बनला असेल तो म्हणजे गोरखगड ट्रेकचा. आमची ट्रेकसाठी पूर्वतयारी अशी काही नसते. ट्रेक पँट, टी शर्ट , खायला काहीतरी , सगळ्यात महत्वाचे पाणी एवढ्या गोष्टी जमल्या की मावळे तयार.
२३ डीसेंबर, २०१७ हा दिवस ढाक बहीरीच्या ट्रेकप्रमाणे आमच्या आयुष्यात लक्षात राहण्याजोगा ठरला. या महीण्यात आम्ही सगळ्यात कठीण २ ट्रेक्स पूर्ण केल्या.
त्याही एकापेक्षा एक कठीण. आमचाच विश्वास बसत नाहीये गोष्टीवर. असो.
मी, अंकुश, रोहन, कल्पेश आणि आकाश असे पाच जण सकाळी ७.३० वाजता कल्यान स्टेशनला जमलो. तिथून मुरबाड जायचे होते. मुरबाडला जायला बसेस खुप असतात , पण सलग तीन सुट्ट्या लागून आल्यामुळे बस स्टँडवर खुपच गर्दी होती. शेवटी ८ वाजता एका बसमध्ये शिरलो. बसायला सीट नव्हत्या. कल्याण ते मुरबाड हा प्रवास उभ्यानीच करावा लागला.
मुरबाडला पोचलो तेव्हा सकाळचे ९.१५ वाजले होते. तिथून डेहरी या गोरखगड पायथा गावात जायचे होते. मुरबाड वरून डेहरी हे अंतर अंदाजे २४ किमी आहे तसेच मुरबाडहून तिथे जायला दिवसभरात बसेस पण कमी आहेत . आम्हाला नियोजीत बस चुकल्यामुळे खाजगी वाहणाने जाणे प्राप्त होते.
डेहरी गावात पोहोचलो तेव्हा १० वाजत आले होते. डेहरी गावातूनच गोरखगड आणि मंच्छिद्रगडचे सुळके मोठ्या दिमाखात उभे असलेले दिसत होते आणि त्यांच्या पाठीमागे पाठीराखा सिद्धगडही लक्ष ठेऊन होता. सिद्धगडाचे खरं विशाल दर्शन गोरखगडाच्या पारथ्याशी गेल्यावर झालं.
सकाळी दहा वाजता ट्रेकला सुरूवात केली. डेहरीगावात गोरक्षनाथांचे सुंदर मंदीर आहे मंदीच्या आवारातून , बाजुनेच गडाकडे जायला वाट आहे. गडाकडे जाणारी वाट चांगली आहे. थोडं चालले की चढण सुरू होते. चढण तीव्र होती. ही चढण गोरक्षनाथांचे तपश्चर्या स्थान येईपर्यंत तशीच राहते. थांबायचे झाले तर चढणीलाच थांबावे लागते. आम्हाला तपश्चर्या स्थानापर्यंत पोहोचायला दिड तास लागला. वाटेत जाताना खुप सुंदर जागा आहेत जिथे फोटो काढायचा मोह आवरत नाही. ट्रेक छोटी असल्यामुळे आही पण आरामात जात होतो.
गोरखगड आणि मच्छिंद्रगड हे त्यांच्या सुळक्यामुळे प्रस्तरारोहकांसाठी ते नेहमीच एक आकर्षण ठरले आहेत. मच्छींद्रगडावर आता कोणी ट्रेकला जात नाही कारण काळे भुंगे हल्ला करून रक्तबंबाळ करतात , असं आम्हाला गडाच्या पारथ्याशी असलेल्या मंदीरात सांगण्यात आले. गोरखगड हे नाथ संप्रदायातील गोरक्षनाथांच्या साधनेचे हे ठिकाण, म्हणूनच याचे नाव ‘गोरखगड’असे पडले. गोरखगड आणि मच्छिंद्रगड याच्या आजुबाजूचा परिसर प्रसिद्ध आहे, तो म्हणजे येथील घनदाट भिमाशंकर अभयारण्यामुळे. गोरखगडाचा विस्तारही तसा मर्यादितच आहे. येथे कोणत्याही प्रकारच्या लढाई झाल्याचा उल्लेख नाही. या गडाचा उपयोग केवळ आसपासच्या प्रदेशवर नजर ठेवण्यासाठी होत असे. पूर्वी नाणेघाट मार्गे जुन्नरला जातांना या गडाचा निवासस्थान म्हणून वापर करत असत. मर्यादित विस्तार असूनही मुबलक पाणी, निवार्‍याची योग्य जागा मात्र या गडावर उपलब्ध आहे. मुरबाड तालुक्यातील वैशिष्टपू्र्ण आकारामुळे लक्ष वेधून घेणारे दोन गड " मच्छींद्रगड आणि गोरखगड, परंपरेने मच्छींद्रनाथ आणि गोरक्षनाथ या गुरू शिष्यांची नावे ह्या दोन गडांना लाभली आहेत. सह्याद्रीच्या घाटवाटांवर नजर ठेवण्याऱ्या या २१३५ फुट उंचीच्या या गोरखगडाच्या पायथ्याशी गोरक्षनाथांचे मंदीर आहे. मंदीराच्या समोर तीन दगडी पाट आहेत त्यावर मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि मीननाथ तपश्चर्येला बसायचे. मंदीराचा परीसर अतिशय सुंदर आहे. तिथे वर्षाचे बारा महीने, रात्रं दिवस एक दिवा तेवत असतो.
गोरक्षानाथांच्या मंदीरापाशी थोडावेळ विश्रांती करून आम्ही गोरखगड चढाईला सुरूवात केली. आमचा इथून खरा कस लागणार होता. समोर गोरखगडाचा कातळकडा आ वासून उभा होता. गोरखगडाच्या मुख्य दरवाज्यापर्यंत पोहोचायला पण दगडातील कठीण चढाई पार करून जावी लागणार होती . त्या वाटेतून चढताना जस जसे वर जात होतो तसे मागे दरीत वळून पाहायला अंगावर काटा येत होता. तसेच ठीकठीकाणी प्रस्तररोहणाला दोर अडकवण्यासाठी कड्याला लोखंडी हूक बांधले होते. धीर सोडून चालणारं नव्हते. हळू हळू का होईना, पाचही जण शेंदूरी कलर दिलेल्या गोरखगड दरवाज्यात पोहोचलो. तिथून मागे वळून पाहील्यावर नजर न पोचणारी दरी आणि सगळे काही व्यवस्थित होईल अशा मानवी चेहऱ्याच्या आकारातील ( सिद्धगडाचा एक भाग कपाळ, डोळे आणि तोंड या आकाराचा आहे) सिद्धगडाचा एक भाग धीर देत होता. गोरखगडाच्या दरवाज्यातून सिद्वगडाचे दर्शन खुपच मोहक दिसते. या दरवाज्या समोर काही आधार नाही, एकदम दरीचं एक्स्पोजर आहे दरवाज्यातून पुढे लगेचच दगडातील कोरीव पायऱ्या आम्हाला वर घेवून गेल्या. तिथेच वर ब्राह्मी लिपीत काही शिल्प कोरलेली आहेत.
दरवाज्यातून इथे आल्यावर पुढची अवघड चढाई बघून आमच्यातील एकाने ट्रेकमधून स्वेच्छा निवृत्ती घेतली. त्याच्या कडे आमच्या बँगा ठेवून आम्ही पुढचा मार्ग धरला. एक अवघड पँच पार करत वर गेलो. त्या पुढील अतिविशाल गुहेपर्यंतची चढाई काहीशी सोपी होती. दगडी पाय-यांचा पॅच लवकरच पूर्ण करून किल्ल्याच्या माथ्याच्या पायथ्याजवळ म्हणजे मुख्य सुळक्याच्या प्रारंभिक उंचीवर पोचलो. तिथेच गोरक्षनाथांची मुख्य गुंफा आहे. समोर जवळच मच्छिंद्रगड मोठ्या दिमाखात उभा दिसत होता आणि बाजूला सर्वत्र नितांत सुंदर नजारा आणि दरी आसपास सर्वत्र सह्याद्रीचे पर्वत सखे दिसत होते. इथे बरंच दगडी बांधकाम केलं आहे. इथल्या गूहेमध्ये रात्री मुक्कामसुद्धा करता येतो. गुंफा बरीच मोठी आहे. इथे सर्वत्र मर्कटांचा वावर आहे. गडावरच एका बाजूला गोड्या पाण्याचं टाकंसुद्धा आहे. समोरच प्रांगणाखाली भयाण दरीत झुकलेले दोन चाफ्याचे डेरेदार वृक्ष आणि समोरच असणारा ‘मच्छिंद्रगड’ निसर्गाच्या भव्य अदाकारीचे असीम दर्शन घडवतो. गुहेच्या आजुबाजूला पाण्याची तीन टाकी आहेत. गोरखगडाच्या पठारावर एकूण चौदा पाण्याची टाके आहेत. पण त्यापैकी गुहे जवळील पाण्याच्या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे.
आता खरे कसब पणाला लागणार होते. गुहेकडून भयाण दरीच्या बाजूने निमुळत्या वाटेने थोडा वळसा घालून पुढे गेल्यावर गडाच्या माथ्यावर जायला एक कातळात कोरलेली वळणावळणाची शिडी दिसते आणि काळजात धस्स होते. शिडी अशासाठी बोलतोय की ८५ डीग्री मधील कोरलेल्या पायऱ्या शिडीसारख्याच वाटतात. इथे आमच्यातल्या एकाची दुसरी विकेट पडते. तो आपली निवृत्ती जाहीर करतो. उरतो आम्ही फक्त तीन ट्रेकर्स.
गोरखगडाचा ट्रेक हा त्याच्या माथ्यावर गेल्याशिवाय पूर्ण होतच नाही. गुहेसमोर तोंड करून उभे राहिल्यावर उजव्या बाजूने जाणार्‍या वाटेने पुढे जावे. थोडे अंतर चालून गेल्यावर सुळक्यावर चढण्यासाठी डाव्या बाजूला कातळात ५० पायर्‍या खोदलेल्या आहेत. ५० पायर्‍यांच्या या मार्गावरून जरा जपूनच चढावे लागते. बऱ्याच पायऱ्यांना हाताने पकडता येईल अशा खाचा केलेल्या आहेत. त्याचा त्या पायऱ्या चढताना खुपच फायदा होता. काही पायऱ्यांचा चढाई थरार अनुभवल्यानंतर पुढे कड्यातच कोरलेले अवघड वळण लागते ते कसे पार केले असेन ते मी शब्दात नाही सांगू शकत. अशा वेळी आमच्यासाठी आमचा परम मित्र अंकुश पिलाने हा आधार ठरला आहे. त्याने ज्या चपळाईने आणि कल्पकतेने पाय टाकले तेच अनुकरण मी केले आणि पुढचा टप्पा सरळ पायऱ्याचा असला तरी मागील दरी काही पिच्छा सोडत नव्हती आणि ८५ डीग्रीची चढण. पण सर्व पार करत गोरखगडावर पोचलो होतो. बरोबर १ वाजता आम्ही गोरखगडाच्या माथ्यावर पाय ठेवले होते.
चढताना दगडी वाट मध्ये मध्ये वळण घेते आणि दगडी वाटेची रुंदी अत्यंत कमी ( कुठे कुठे तर जेमतेम एक फूट आणि कुठे कुठे तर त्याहून थोडी व मोठी गॅप असलेली) आहे. दगडामध्ये अनेक ठिकाणी खोबणी व खाचा आहेत. बाहेर आलेले काही दगड व दगडाचा भाग आहेत. त्यावर पाय आणि हात ह्यांना होल्ड करून वर चढायला लागते.
आम्ही जेवढ्या काही ट्रेक केल्यात त्या वरून काही गोष्टी समजल्या. म्हणजे चढताना जास्तीत जास्त भार पायांवर आणि पायाच्या बोटांवर द्यायचा. हातांवर भार घ्यायचा नाही, हात फक्त दगडांना धरून आधार देण्यासाठी आहेत. आपल्या हातांना आपलं वजन फार वेळ घेता येत नाही. कारण आपल्या हाताच्या बोटांमध्ये तेवढी ताकत नसते. पण आपण आपल्या पायांवर जास्त वजन देऊ शकतो. कारण त्यामध्ये ती ताकत असते व आपण दिवसभरात दोन तास तरी आपल्या पायांवरच असतो. उतरताना ज्या स्थितीमध्ये चढलो, तसंच म्हणजे दरीकडे पाठ करून उतरायचं आहे. सरळ उतरण्याचा प्रयत्न करायचे नाही . अशा बऱ्याच गोष्टी होत्या पण मनामध्ये प्रचंड धाकधुक होती. कारण कितीही काळजी घेतली तरीही एक्स्पोजर जरा जास्तच होतं. मनाशी विचार केला, आधीच इतकं वर आणि इतकं धोकादायक प्रकारे आलो होतो. खाली जाताना फुल वाट लागणारच आहे. तिथे काही बदल होणार नव्हता.
जेव्हा माथ्यावर पोहोचलो तेव्हा सह्याद्रीच्या अनेक डोंगरांची रांग दिसत होती. समोरच मच्छिंद्रगड दिसत होता , पण तो आता बुटका वाटत होता. दूरवर खाली कित्येक अंतर दूरवर सपाट जमीन आणि रस्ता दिसत होता. एका बाजूला सिद्धगड आणि आसपासची डोंगररांग दिसत होती.
गडाच्या माथ्यावर चक्क एक छोटं मंदीर बांधलेलं होतं. ते कसं बांधले असेल त्याची कल्पनाच करवत नाही . मंदीरात रोज पुजा होते हे महादेवाच्या पिंडीवर घातलेल्या ताज्या फुलानी आणि पिंडीसभोवतालच्या जागेवरून दिसून आले. मंदीराच्या आसपास काही झाडं लावलेली आहेत. एक नारळाचे रोपटे बघून खुपच बरं वाटले. एवढ्या उंचावर आपल्या सोबत कोणीतरी असल्याची भावना त्या रोपट्यामुळे आली. गडाच्या माथ्यावर मात्र बसण्यासाठी (सुरक्षित) जागा होती. तिथे थोडावेळ बसलो आणि उतरायला सुरूवात केली.
उतरताना कसे उतरणार याचीच धाकधुक होती. मी उतरण्यासाठी सगळ्यात पुढे लागलो. हळु हळु वळून आणि दरीकडे पाठ करून उतरण्यास सुरुवात केली. तीन ठीकाणी धोकादायक वळणावर पायऱ्या पार धोकादायक होत्या जेमतेम एक पाय राहील एवढ्या रूंदीच्या पायऱ्या होत्या. वरच्या बाजुला तर पायऱ्यानांच खाचा करून हँडलसारखे कोरले आहे त्याचा उपयोग खुपच झाला. हा पॅच चढताना उतरताना एका छोट्या गुहेपाशी आपण थांबू शकतो. ते एक दिलासा देणारे होते. पण मागची दरी काही मनातली भीती पूर्ण पणे घालवत नव्हती. हळू हळू पाय-या आणि त्यात कोरलेल्या खाचांवर लक्ष ठेवत अवघ्या १५ मिनिटात आम्ही खाली उतरलो. माझ्या मागोमाग अकुश आणि त्याच्या मागे आकाश असे एक एक सर्व खाली उतरलो. उतरल्यावर आमचा आनंद पार गगणात मावेसा झाला. आरोळ्या ठोकत आनंद व्यक्त केला. हा अवघड पँचपुढे पुढील उतरन सोपी वाटू लागली होती. तरी पण पूर्णपणे काळजी घेत पायथ्याशी आलो. गोरक्षानाथांच्या मंदीराच्या समोरच्या प्रांगणात जेवायला बसलो. जेवन झाल्यावर पुढील तासाभराची वाट उतरून ट्रेक पूर्ण केली.
दऱ्या, खिंडी, घनदाट जंगलातील वृक्षवल्ली व पशुपक्षी या सर्व आकर्षणापायी इतिहास निरीक्षण जिद्द आणि साहसाची भूक भागावणाऱ्या या दुर्गम बिकट वाटांमधील गोरखगडावर दुर्गरोहींची पावले आपोआप वळतात.
शब्दांकण - नितीन राणे
९००४६०२७६८

एक अविस्मरणीय ट्रेक - हरीहर

एक अविस्मरणीय ट्रेक- हरीहर
२६ जानेवारी २०१८
हरीहरगडाचा फोटो मी खुप वर्षापुर्वी फेसबुकला पाहीला होता. तो फोटो बघुनच भीतीने मनात धडकी भरली होती. तेव्हा ट्रेकचे भूत लागलं नव्हतं. कोणी लाख रूपये दिले तरी इथे जाणार नाही आणि आता जेव्हा पासुन ट्रेकींगचे वेड लागलयं तेव्हा पासून या गडावर जायचे वेध लागले होते. चार पाच वेळा प्लान्स बनून पण फिसकटले होते. हरीहरगड ओळखला जातो तो पायऱ्यांमुळे! त्या गडावरील कातळात कोरलेल्या पायऱ्या मनावर छाप उमटवतात! भटका माणूस रायगडावर जाऊन जसे टकमक टोक, बाजारपेठ, दरबार विसरत नाही किंवा राजगडावर जाऊन जसे तेथील बालेकिल्ल्याचे चित्र पुसून टाकू शकत नाही किंवा हरिश्चंद्रगडावर जाऊन जसा कोकणकड्याचा अजस्त्र आविष्कार आयुष्यभर मनात ठेवून वावरत राहील, तसाच
प्रकार हरिहरगडाच्या पायऱ्यांच्या बाबतीत घडतो! गडांच्या यादीतील थोडे वेगळे नाव आणि तसेच आडवाटेवरचे स्थान म्हणजे हरिहर!
गेल्याच महीन्यात गोरखगड केला तेव्हा काहीजण बोलले होते गोरखगडच्या तुलनेत हरीहर गड ट्रेकींगसाठी सोपा आहे. गोरखगडने आपली अवघडता कायम ठेवलीय पण लोक हरीहरच्या प्रेमात जास्त आहेत. त्यातलाच मी.
आमच्या रेग्यूलर ग्रुपचे कलावंतीन स्टे पाठोपाठ इरशाळगडचा प्लान देखील फसला. त्यात सलग तीन सुट्टया काही प्लान नाही बनवले तर महाराज मात्र रागवतील. म्हणुन मी आणि माझा एक मित्र अमित जो पहील्यांदाच ट्रेक ला तयार झाला होता, माहुलीगडाचे प्लान करत होतो. त्याची माहीती घेण्यासाठी मी माझ्या एक फ्रेंडला कॉल केला. पण ते सर्व जण नाशिकला जाणार होते आणि त्यांच्या अजेंड्यामध्ये हरीहर गड पहीला होता. हे ऐकून माझ्या तोंडाला पाणी सुटले. डोक्यातून माहूलीगड तात्पुरता बाजूला झाला आणि त्याची जागा हरीहरने घेतली. मी संध्याकाळी रेल्वेच्या तिकीट्स बुक केल्या.
रात्रीच्या ट्रेनने आम्ही मुंबईहून सहा जण नाशिकला निघालो तेव्हा थोडीफार थंडी होती. पण जेव्हा पहाटे ४ वाजता नाशिकला उतरलो तेव्हा थंडीचा कहर अनुभवयास मिळाला. त्यावेळी माझ्या मनात आले आपले एवरेस्ट बेस कँप ट्रेकचे स्वप्न कसे पुरे होणार? आम्हाला नाशिक स्टेशनला न्यायला आमचे मित्र बाईक घेऊन आले होते. मी पहील्यांदाच भल्या पहाटे दातओठ खाणाऱ्या थंडीत बाईक राईड अनुभवली. हॉटेलला पोहोचेपर्यंत ५ वाजले होते. तिथे फ्रेश होऊन मित्रांनीच बनवलेला वर्डक्लास चहा आणि पोह्यावर यथेच्च ताव मारत आम्ही सकाळी ७ ला त्रिंबक हर्शवाडी च्या दिशेने रवाना झालो. सुर्य उगवला तरी थंडी कमी झाली नव्हती. मुंबई आग्रारोडने जात असताना काही अंतरावर अंजनेरी पर्वत लागला. पुढे रस्त्याच्या बाजुला सर्व पर्वतच उभे ठाकले होते. आम्ही हर्षवाडी गावात पोहोचलो तेव्हा सकाळचे ९ वाजले होते. उन्ह वर येऊन पण हवेत कमालीचा गारवा होता.
हरीहरच्या मुख्य पायऱ्यांपर्यंत पोहोचायला आम्हाला १ तास लागला. पायथ्या पासून तिथपर्यंत जायला दोन खड्या चढणी पार कराव्या लागतात. वाट मळलेली आहे पण बऱ्याच ठीकाणी निसरडी आहे. चढताना खुप जपून चढावे लागते. आम्ही हरिहर गडाच्या रेखीव पायऱ्यांपर्यंत तासाभरात पोचलो. समोर पाहीले तर तेथील दगडी जिना मनातील धाकधुक वाढवत होता. ही दगडी वाट वाटही वैशिष्ट्यपूर्ण आहे. साधारण ऐंशी अंशाच्या कोनामध्ये सरळ रेषेत ती जणू आभाळात घुसते. ती वाट चढण्यास सुरुवात केली, की त्याला तिचा खरा अंदाज येतो. एकावेळी एकच मनुष्य वर किंवा खाली जाईल अशा पद्धतीची तिची रचना आहे. पायऱ्यांवर दोन्ही बाजूंनी खोबण्या आहेत. त्‍यात पंजा रुतवता येतो व वर चढताना त्यांचा आधार मोठा ठरतो. सुमारे नव्‍वद पायऱ्यांचा सोपान चढल्‍यानंतर गडाचे पहिले छोटेखानी पण सुरेख प्रवेशद्वार लागते. त्या प्रवेशद्वारातून आलेली वाट पाहिली तर असे लक्षात येते, की वर येणे एकवेळ सोपे, मात्र उतरणे महाकठीण. आम्ही एका मागोमाग एक असे फक्त आणि फक्त पायऱ्यांवर लक्ष केंद्रीत करत वर चढत होतो. मागे वळून बघायची हिम्मत होत नव्हती. आ वासलेली भयानक काताळी दरी पाठीशी होतीच. एका छोट्याश्या चुकीचे थेट मृत्युत रूपांतर. मला फक्त प्रत्येक पायरीच्या खोबण्या दिसत होत्या. तसेच वरून खाली येणाऱ्या एखाद्या ट्रेकरला जागा करून देताना मात्र आमची पंचायत होत होती. पण आम्ही तो अवघड जिना चढलो. त्यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्या सारखा होता. आमच्या मध्ये पहील्यांदाच ट्रेक करणारे दोघेजण होते. त्यांचा आनंदाला तर सीमाच उरली नव्हती. या पायऱ्या चढून आल्यावर शेंदुरी रंगाच्या प्रवेशद्वाराच्‍या शेजारी गणेशाची शेंदूर फासलेली छोटी मूर्ती दिसते. प्रवेशद्वाराच्या पुढे, गडाच्या पोटात खोदलेला रस्ता आहे. उलट्या ‘सी’ इंग्रजी आकारासारखा किंवा नारळाच्या अर्ध्या करवंटीसारखा. कातळात कोरलेले दोन दरवाजे पार केल्‍यानंतर सुमारे एकशे तीस पायऱ्यांचा दगडी जिना लागतो. त्‍या जिन्‍यासही दोन्‍ही बाजूंस आधारासाठी खोबणी आहेत. त्याच्याच पुढे, वर जाण्यासाठी अप्रतिम असा दगडी बोगदा आहे. गडावर एकापेक्षा एक सरस सौंदर्याकृती पायघड्या टाकून पुढे येत राहतात. त्यामुळे एका रचनेचे कौतुक करायला जावे तर दुसरी समोर! वास्तुस्थापत्याचे ते सौंदर्यतुषार झेलतच गडाच्या माथ्यावर वावर चालू राहतो. त्या पायऱ्या चढताना विशेष काही वाटले नाही. एक बाजू एक्सपोज होती पण दोन्ही बाजूला आधार होता.
हरिहर किल्ल्याचा शेवटचा छोटा दरवाजा पार करून थोडे पुढे गेल्यावर डाव्या हाताला खालच्या बाजूस गुहा दृष्‍टीस पडते. पण तेथे उतरण्यासाठी दोराची आवश्‍यकता भासते. गडमाथ्यावर मोठा तलाव आहे. पश्चिमेकडे भिंत बांधून त्या तलावाचे पाणी अडवण्‍यात आले आहे. तलावाच्‍या काठावर हनुमानाचे मंदिर असून शेजारी उघड्यावर असलेले शिवलिंग आणि नंदी आहेत. गडाच्या टोकाला दारुगोळा कोठाराची इमारत आहे. त्या इमारतीभोवती पाण्याची सहा टाकी दिसतात. लहान मोठ्या टाक्यांची रचना मन मोहवून जाते किल्ल्यावरील सर्वांत उंच जागा चढायला पण थोडी कसरत करावी लागली. गडाच्या माथ्यावरून सभोवारचे विहंगम दृश्‍य फार छान दिसते. तेथून पूर्वेकडे दिसणारे त्र्यंबक डोंगररांगेचे चित्र डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. उत्तरेच्‍या दिशेला वाघेरा किल्‍ला तर दक्षिणेकडे वैतरणा तलावाच्या पार्श्वभूमीवर उभे असलेले कावनाई व त्रिंगलवाडी किल्ल्यांचे डोंगर फार आकर्षक दिसतात. हरीहरच्या सर्वात उंचीच्या माथ्यावरून दिसणारे दृश्य विहंगम होतेच पण पहील्यांदाच प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आम्ही तिरंगा फडकविला होता. खरोखर माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण ठरला. त्याचे सर्व श्रेय अजिंक्यला जाते, त्याची ती आयडीया. सर्वात उंच माथ्यावर राष्ट्रगीत म्हणताना आमची छाती मात्र अभिमानाने फुलली होती. एक वेगळाच रोमांच अंगावर आला होता.
तिथून खाली उतरल्‍यानंतर आम्ही उतराच्या वाटेवर एका झाडाखाली नाशिकमधल्या रवी या मित्राने घरून आणलेल्या जेवनाचा आस्वाद घेऊन पुढच्या मार्गाला लागलो. थोडं खाली उतरल्यावर समोर घुमटाकार माथा असलेली तीस फूट लांब व बारा फूट रुंद अशी दगडी कोठी दिसते. पूर्वीच्‍या काळी तेथे दारूगोळा साठवला जाई. कोठीचे प्रवेशद्वार छोट्या खिडकीसारखे असून त्या कोठीत दिवसासुद्धा काळोख असतो. ती गडावरील छत शाबूत असलेली एकमेव इमारत आहे. तेथून समोर दिसणारा ब्रह्मा डोंगर फार सुंदर दिसतो. हरिहरगडाची फेरी पूर्ण करण्यास सुमारे दोन तास लागतात. गड पाहून परत उतरताना पुन्‍हा त्‍या सरळसोट पायऱ्या समोर येतात. त्या फारच धडकी भरवणाऱ्या होत्या. त्‍यामुळे उतरताना विशेष काळजी घ्‍यावी लागत होती. प्रत्येक पाऊल योग्य दिशेने पडायला हवं होतं. काही ठिकाणी पायऱ्या एवढ्या बाहेर आल्यात की थोडं जरी पाऊल पुढे पडले तरी थेट दरीत रवानगी होणार होती. त्यामुळे दरीकडे पाठ करूनच उतरावे लागत होते. याच कारणास्तव उतरायला वेळ लागत होता. तेही पार करत आम्ही गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराशी पोचलो पण खालून वर येणाऱ्या ट्रेकर्सची संख्या खुप होती. त्यामुळे आम्हाला उतरायला जागा मिळत नव्हती . पंधरा मिनिटांच्या प्रतिक्षेनंतर उयरायला जागा मिळाली. तेव्हा मला कळसुबाई ट्रेकची आठवण झाली. तिथे पण लोखंडी शिडीवर जाणाऱ्या येणाऱ्यांची गर्दी झाली होती आणि एका एका शिडीवर ६० ते ७० लोक जाण्या येण्याचा प्रयत्न करत होते. इथे पण ट्रेकला जत्रेचे रूप आले होते. यात रात्री स्टे करणारे उशीरा चढत होते. प्रवेशद्वारापासूनच्या पायऱ्या उतरताना पण खुप काळजी पूर्वक उतरावे लागत होते. इथे पण आम्ही दरी कडे पाठ करत एक एक पायरी खाली उतरलो. खऱ्या अर्थाने इथेच ट्रेक संपते असं काहीना वाटते पण त्या नंतर चढताना लागली खडी चढण उतरताना मात्र अवघड होऊन बसते. काही ठीकाणी बसून उतरल्याशिवाय पर्याय उरत नाही. अशा रितीने एक रोमांचकारी ट्रेक पुर्ण करून नाशिकहून मी आणि अमित मुंबईकडे परत निघालो.
हरीहरचा इतिहास (माहीती whatsapp वरून प्राप्त)
गडावरील कातळात पायऱ्या कोरण्‍याची पद्धत सातवाहन राजवटीपासून चालत आली आहे. बहुतांशी गडांवर तशा पायऱ्या दिसतातही; परंतु अनेक ठिकाणी त्या कालौघात, विशेषत: इंग्रजांनी १८१८ मध्ये केलेल्या विध्वंसात नष्ट झाल्या.
हरिहर हा नाशिक जिल्ह्यातील क्षेत्र त्र्यंबकजवळील हर्शवाडी गावानजीक वसलेला गड. त्‍याचे स्‍थान ब्रम्‍हगिरीच्‍या पश्चिमेस सुमारे वीस किलोमीटर अंतरावर आहे. हरिहर किल्‍ला अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात होता. शहाजीराजांनी १६३६ साली त्‍याशेजारच्‍या त्र्यंबकगडासोबत तोही किल्ला जिंकून घेतला. नंतर त्याचा ताबा मोगलांकडे गेला. पुढे, १६७० मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी तो गड जिंकून स्वराज्यात मोलाची भर घातली. मोगल सरदार मातब्बरखान याने हरिहर किल्ला ८ जानेवारी १६८९ रोजी जिंकला. शेवटी, १८१८ मध्ये तो गड मराठयांच्या ताब्यातून इंग्रजांनी जिंकून घेतला. इतिहासात अशी विविध मालकी अनुभवणारा त्र्यंबकगडापाठोपाठ हरिहरगड हा त्या भागातील दुसरा महत्त्वाचा किल्ला आहे.
हरिहरगड ‘हर्शगड’ या नावानेदेखील ओळखला जातो, त्याचे कारण त्याच्या पायथ्याला ‘हर्शवाडी’ नावाचे गाव आहे. हरिहरगडाचा त्रिकोणी आकार, त्‍याच्‍या कातळात कोरलेल्या पायऱ्या, पुढे कोठालीगड (पेठ) प्रमाणे उभ्या कोरलेल्या पायऱ्या आणि गडावरील इतर दुर्गावशेष अशा साऱ्याच गोष्‍टी वैशिष्‍ट्यपूर्ण आहेत. तो किल्‍ला समुद्रसपाटीपासून ११२० मीटर उंचीवर उभा आहे. मराठेशाही बुडवण्याच्या १८१८ सालच्या इंग्रजांच्या धडक कारवाईत कॅप्टन ब्रिग्ज या इंग्रज अधिकाऱ्याने हरिहरगड जिंकून घेतला. मात्र गडाच्या पायऱ्या बघून तो आश्चर्यचकित झाला व उद्गारला, “या किल्ल्याच्या पायऱ्यांचे वर्णन शब्दांत करणे कठीणच. सुमारे दोनशे फूट सरळ व तीव्र चढाच्या या पायऱ्या अतिउंच ठिकाणावर बांधलेल्या एखाद्या जिन्यासारख्या वाटतात”. त्या वेळी इंग्रजांचे धोरण गिरिदुर्गांच्या वाटा व प्रवेशमार्ग तोफा लावून उद्ध्वस्त करण्याचे होते. त्यानुसार त्यांनी अनेक गडांचे मार्ग उद्ध्वस्त केले. त्‍यात अलंग-मदन-कुलंगगड, सिद्धगड, पदरगड, औंढा इत्‍यादी किल्‍ल्‍यांचा समावेश होतो. पण हरिहर किल्ल्याच्या अनोख्या पायऱ्यांनी त्‍यांच्‍या राकट सौंदर्याची मोहिनी कॅप्टन ब्रिग्जवर घातली. त्‍यामुळे त्याने हरिहरगड जिंकून घेतला, पण त्या सुंदर पायऱ्यांच्या मार्गाला धक्‍काही लावला नाही. यावरूनही त्‍या पायऱ्यांची आकर्षकता किती विलोभनीय असेल याचा अंदाज बांधता येतो.
जगदंब..
नितीन राणे
९००४६०२७६८