Friday, 2 November 2018

©आमची माहुली किल्ला चढाई..

©आमची माहुली किल्ला चढाई..
२७.१०.२०१८

         तब्बल दोन महीन्याच्या विश्रांती नंतर परत एकदा ट्रेक करायची खुमखुमी आली. यावेळी आम्ही एकदा हुलकावणी दिलेल्या माहुली किल्ल्याची निवड केली. थंडीची चाहुल लागलीच होती आणि एक दिवस जोराचा पाऊस झाला. परत थंडी गायब. पण आमची ट्रेक काही रद्द करणार नव्हतो. मला २६ ऑक्टोबरच्या रात्री झोप काही लागली नाही. ४ वाजताचा अलार्म लावून झोपलो खरा पण जेव्हा तो वाजला तेव्हा कोणत्या प्रकारची झोप लागली कोणास ठाऊक ? आणि अचानक ५ वाजता जाग आली. खरंतर मला बदलापूरहून ५.०५ वाजताची ट्रेन पकडायची होती. पण सगळं मुसळ केरात. पहील्यांदाच माझ्यामुळे बाकीच्यांना उशीर होणार होता. पण आपले साथीदार समजूतदार असले कि सारं काही ठीक होते. या सर्व प्रकारामुळे आम्हाला सुमारे १ तास उशीर झाला. यावेळी रूपेश सावंत ऐवजी अमित गावडे सामील झाला होता. कल्पेश, मी , संतोष आणि अमित असे आम्ही चार जण माहुली सर करायला निघालो. आसनगांव पश्चिम वरून माहुली गावासाठी रिक्षा करून पायथा गावात पोचलो. हवेत थोडासा गारवा होता. जराही टंगळमंगळ न करता चढाईला सुरुवात केली. माहुली गडाच्या जंगलाच्या प्रवेशद्वारापाशीच आम्हाला अजून तीन साथीदार येऊन मिळाले. असे आमच्या प्रत्येक ट्रेकला घडते. एक तरी कुत्रा आमची सोबत करत असतो पण त्याची साथ काही अंतरापर्यंतच असते. ह्या तिघांनी आपापसात आपल्या भाषेत एकमेकांना सुचना देऊन आमच्या पुढे दोघेजण आणि एक कुत्रा मागे राहीला. त्यांना जणु देवानेच आमच्या रक्षणासाठी पाठवले असावे. आम्ही त्यांचे लगेच नामकरण केले. अंगाने धष्टपुष्ट असलेल्या लाल कुत्र्याला लाल्या, दुसऱ्या एका कडक्या लाल कुत्र्याला मोत्या आणि पांढरे काळे पट्टे असलेल्या कुत्र्याला बंड्या असे नाव दिले.

सुर्यदेव नुकतेच डोकावू लागले होते. चढाई सोपी असली तरी पायाखाली सरकणाऱ्या छोट्या दगडामुळे घसरायला होत होते. सुरूवातीला घनदाट जंगलातून जाताना छान वाटत होते. फक्त मच्छरचा त्रास खुप होता. आम्ही सकाळी ७.३० चढाई सुरूवात केली पण निसरड्या वाटेमुळे आमचा वेग मंदावत होता. जेव्हा जंगल संपून उघड्या माळावर आलो तेव्हा सकाळी सकाळी पण ऑक्टोबर गरमी काय असते त्याचा प्रत्यय येऊ लागला. लाल्याची खुपच दमछाक होत होती पण तो आमच्या पुढे राहत होता. त्याला थांबावेसे वाटले की तो मागे वळून आमच्याकडे पाहायचा. आम्हालाही चढाई दरम्यान विश्रांती हवीच होती. फोटोजनीक पॉईन्ट बघून आम्ही विश्रांती आणि फोटोसेशन आटपत होतो. सुर्याच्या सोनरी किरणात चकाकणारा माहुलीने आपली हिरवी दुलई केव्हाच सोडली होती. तो आपले कड्यातले रौद्ररूप दाखवत निश्चल उभा होता. त्याला न घाबरता त्याच्या डोळ्यात डोळे घालून चढणाऱ्या प्रत्येक पर्वतरोहीला त्याच्याकडे असलेला ऐतिहासिक खजिना दाखवणार होता. आम्ही जसं जसे चढत होतो तसं तशी आमची चढाई कठीण होत चालली होती. सुर्यदेव जराही कृपा करायला तयार नव्हते. प्रत्येकाने २ लिटर आणलेल्या पाण्याचे निम्मे कंझ्मप्शन अर्ध्या वाटेतच झाले होते. लाल्या आणि त्याच्या आप्तेष्टांना तहान लागली असावी ते जोरजोरात तोंडाने धपापत होते. आमच्या कडे पाणी असून पण आम्ही त्यांना ते भांड्याअभावी देऊ शकत नव्हतो. गडावर पाण्याचा भरपुर साठा असल्याचे कळले होते. आम्ही आमची पावले वाटेत येणाऱ्या प्रत्येक दगडात रोवत भरभर चालू लागलो. घामाने अंगावरील कपडे पार भिजून गेले होते. चढाई सुरू करून दोन तास होऊन गेले होते. माहुलीवरील मोठा झेंडा आता दृष्टीक्षेपात आला होता. झेंडा दिसताच आमची पावले जोर धरू लागली. आम्ही मध्येच एखाद्या झुडपाचा आधार घेऊन उन्हापासून बचाव करत होतो. आता शेवटचा टप्पा दिसत होता. माहुली ही ट्रेक कल्याण दरवाजा कडचा भाग सोडला तर फारशी कठीण नाही पण सोपी सुद्धा नक्कीच नाही. दरीच्या बाजूने जाणारी निमुळत्या वाटेत एका छोट्याशा चुकीमुळे दरीत गडप होण्याची वेळ येऊ शकते. लाल्या आणि कंपनीच्या सोबतीमुळे आम्हाला ट्रेकमध्ये खुप मजा येत होती. एका खाण्याच्या ब्रेकदरम्यान आमच्या पिशवीतून केळी निघाल्यावर लाल्या आणि कंपनी नाराज झाली होती. आम्ही त्यांची नाराजी ओळखून बिस्कीट पुडा बाहेर काढला. त्या बरोबर सगळ्यांच्या शेपट्या गोल फिरायला लागल्या. इथे आम्हाला प्रत्येक वेळेच्या अनुभवावरून वाटले की यांची साथ त्यांना खायला मिळाल्यावर संपेल. पण ते तिघे ही आमच्यासोबत पुढे निघाले. शेवटच्या टप्प्यावर गडाचा कडा पार करण्यासाठी एक लोखंडी शिडी चढायची होती. खरी गम्मत आता येणार होती. आम्ही चौघेजण शिडी चढून वर आलो. आमच्या जेव्हा मागोमाग लाल्या आणि बंड्या जोडीने शिडी चढायला लागले तेव्हा तो प्रसंग बघण्यासारखा होता. बघता बघता दोघांनी ती शिडी पार केली. पण मोत्या कुत्र्याने आपली ट्रेक तिथेच संपवून आमच्याकडे पाहत खाली बसला. आम्ही गडावर पोचलो तेव्हा साडेदहा वाजले होते. तब्बल तीन तासाच्या चढाई नंतर हा क्षण अनुभवायला मिळाला होता. तिथे आम्ही नाष्टा करून गड फिरायला निघालो. गडावरील विस्तीर्ण पठारामुळे एका दिवसात गड फिरून होत नाही.
गडाच्या उजव्या हाताकडून थोडे वरच्या बाजूला गेल्यावर एक पाण्याचे टाके दिसते. तिथून दोन वाटा फुटतात त्यातली डावी कडची एक वाट कदाचित हनुमान दरवाजा कडे जात असावी ( जो वेळे अभावी आम्हाला पाहता नाही आला) आणि दुसरी वाट जाते ती वरच्या बाजूला. तिथून वरच्या बाजूने चालत गेल्यानंतर अजून एक डाव्या बाजूला वाट जाते. इथे मात्र दिशादर्शक फलक लावलाय. डाव्या साईडला जाणाऱ्या वाटेच्या दिशेला महादेवाचे मंदीर आणि शिवतलाव असे लिहीले आहे. पण आम्ही सुरूवातीला तिकडे न वळता सरळ पठाराच्या दिशेने अशासाठी चालत गेलो कि खरंतर गडावरचा सगळा परिसर आम्हाला पाहायचा होता.
त्यामुळे आम्ही भरभर चालत पठारावरील मळलेल्या वाटेने पुढे जात होतो. दूरपर्यंत कोणतीच पाहण्याजोगे वास्तू कींवा ठिकाण दिसत नव्हते. आमच्या गटातील तिघांनी पुढे न जाण्याचा निर्णय घेतला. पण माझे मन मला तसं करण्यापासून थांबवत होते. त्यांना तिथेच बसायला सांगून पुढे काही दिसते का पाहायला मी भराभरा चालत निघालो. पुढे जात असताना गडाच्या तटबंदी बाजूने एक वाट खालच्या बाजूला गेलेली दिसली. मी सहज नजर टाकली तर खाली पुरातन बांधकाम दिसले. मी लगेच बाकीच्या साथींदारांना बोलावून घेतले. आम्ही सर्वजण खाली उतरून पाहतो तर एक स्वच्छ पाण्याचे चौकोनी जलकुंड वाहत होते , बाजूला एका गर्द झाडाखाली महादेवाची पिंडी त्यावर पितळेच भांडे पाहून मनाला शांती मिळाली. त्या समोरच दिमाखात बसलेले आपले महाराज. तिथून खाली गेल्यावर माहुली कील्ल्याचा महादरवाजा दिसला. पण त्याची खुपच पडझड झालेली आहे. दरवाजातून खाली गडउतार होणारी वाट पार उध्वस्त झाली असल्यामुळे त्या बाजूने उतरता येत नाही. या महादरवाजाच्या आजूबाजूचे तटबंदी बांधकाम आजही मजबूत स्वरूपात आहे. महादरवाजाच्या आतल्या दोन्ही बाजूला दगडात कोरलेल्या छोट्या छोट्या गुहा आहेत. गुहांचे कोरीव काम पाहण्याजोगे आहे. शिवाय दगडी दरवाज्यावरील कमान सुबक नक्षीकाम आजही चांगल्या स्थितीत आहे. जलकुंडातून येणाऱ्या पाण्याने तहान भागवून बराच वेळ तिथे घालवला आणि आम्ही शिवतलाव आणि महादेवाचे मंदीर पाहण्यासाठी गडाच्या दुसऱ्या टोकाला निघालो. कल्याण दरवाजा बद्दल खुप ऐकून होतो तोही पाहायचा असल्याने आमची पावले झपाझप पडत होती. आता डोक्यावरच्या उन्हाचा त्रास जाणवत नव्हता.

माहुली गडा पठारावर वाटा जरी नीट असल्या तरी वाटांच्या बाजूला बरीच झाडेझुडपे वाढलेली आहेत. जागोजागी पडक्या वाड्यांच्या खुणा आढळतात. शिवाय दिपस्तंभाचे अवशेष ही काही ठिकाणी दिसतात. आम्ही काही वेळातच महादेवाच्या पडक्या मंदिराच्या ठिकाणी पोचलो. मंदिराची झालेली पूर्ण पडझड पाहून मन विषन्न होते. मंदिराच्या समोरच स्वच्छ नितळ पाण्याचा शिवतलाव आहे. तिथे काही क्षण घालवून आम्ही कल्याण दरवाजा कडे प्रस्थान केले. कल्याणदरवाजाच्या वाटेवरून थोडे पुढे गेल्यावर खालच्या बाजूला हनुमान दरवाजाकडे जाणाऱ्या मार्गाचा मार्गदर्शक फलक लावला आहे. हनुमान दरवाजा शेवटी पाहू असे ठरवत आम्ही पुढे निघालो. थोडे चालल्यानंतर एक छोटीशी आडवी दरी लागली ती पार कडून चढून वरच्या बाजूला जायचे होते. वर चढून जायला एका कड्याला एकावर एक अशा दोन शिड्या लावलेल्या दिसल्या. आम्हाला वर चढून जायला काही कठीण नव्हते पण आमच्या सोबतच्या लाल्या आणि बंड्याला शिडीवरून कसे चढता येणार हा प्रश्न होता. आम्ही वर चढल्याबरोबर दोघेही कुय कुय करू लागले. त्यांचा प्रवास तिथेच संपणार होता. मी माझ्या जवळचा अर्धा पुडा त्यांच्यासमोर खाली करत आम्ही आमच्या पुढच्या मार्गाला लागलो.
काही वेळातच पठारावरील गर्द झाडीच्या रानातून चालत कल्याण दरवाज्याच्या वरच्या बाजूला पोचलो. ही पठारावरील वाट एक भुलभुलय्याच आहे. पण ती चांगली मळलेली असल्यामुळे सहसा चुकायला होत नाही. कल्याण दरवाजाच्या वरच्या बाजूला आलो खरे पण कल्याण दरवाजा पर्यंत उतरणे थोडे धोकादायक होते. माझ्या सोबतच्या तिघांनी आपली निवृत्ति जाहीर केली. पण माझं पण मला स्वस्थ बसू देईना. दरीच्या बाजूने एका निमुळत्या वाटेने दरवाज्याच्या दिशेने उतरू लागलो. पायाखालचे सुकलेले गवतावरून पाय सरकण्याची शक्यता जास्त होती. त्यानंतरचा एक छोटासा रॉक पॅच शरीर थोडेसे हवेत ठेवत उतरलो. जेव्हा जमिनीला पाय लागले तेव्हा जीवात जीव आला. एक छोटीशी चूक खुप काही करू शकते. कारण जेवढा वेळ माझं शरीर हवेत होतं तेवढा वेळ मनात भीती होती. लगेचच एका चिंचोळ्या वाटेने छोट्याशा दरवाजाकडे पोचलो. तिथून कल्याणचा महाकाय दरवाजा आणि त्यापुढील उध्वस्त पायऱ्या समोर असणाऱ्या दरीची भयावहता दाखवत होते. मला त्या उध्वस्त पायऱ्यांपर्यंत पोहोचायचे होते. पण मी ज्या छोट्या दरवाजाच्या इथे बसलो होतो तो पण मोडकळीस आला होता. वरचा भाग कधी पडेल याची शाश्वती नव्हती. मी तिथून सरकून खाली उतरण्यासाठी धडपड करू लागलो आतापर्यंत कधी कोणतीही ट्रेक अर्धवट ठेवली नव्हती. कातळकड्याच्या बाजूने थोडे पुढे चालत गेल्यावर समोर वेगळेच आव्हान उभे होते. कल्याण दरवाजाकडे उतरायला एक जाडा बांबू उभा करून ठेवला होता. त्या सोबत काळ्या रंगाची वायर कड्याला हूक मारून बांधून ठेवली होती. मी जवळ जावून पाहीले तर जाडा बांबूची अवस्था डळमळीत दिसली. मी कधीही Calculated Risk घेतो. एकंदरीत बांबूची अवस्था पाहता त्याला पकडून मला खाली उतरण्याचा धीर झाला नाही. उतरताना एक जरी चुक झाली असती तर सरळ दरीत कपाळमोक्ष होता. वरच्या पठारावरून माझा सहकारी कल्पेश मला हाक मारत होता. तो जेव्हा जेव्हा माझ्यासोबत ट्रेकला आलाय प्रत्येक वेळी त्याने माझी काळजी घेतलीय. मी जरा जरी धोकादायक ठिकाणी गेलो तर त्याची हाक पहीली असते. त्याच्यामुळे मीही आवरते घेतले. परत कधी जमले तर नक्की कल्याण दरवाजाला भेट देईन अस मनाशी बोलत परत एकदा कल्याण दरवाजा कडचा भाग डोळ्यात साठवत पठाराच्या दिशेने चढायला सुरुवात केली. मी पठारवर आलो तेव्हा लाल्याला तिथे बघून आश्चर्यचकीत झालो. लाल्या तो दरीकडचा कडा कसा चढून आला असेल? खरचं त्याने आम्हाला शेवटपर्यंत साथ केली होती.

आम्ही सोबत.आणलेल्या शिदोरीवर यथेच्छ ताव मारत आम्ही परतीच्या वाटेला लागलो. गडावरचा परीसर डोळ्यात साठवत गड उतरायला सुरुवात केली. येताना पण लाल्या मागे राहीला त्यामुळे त्याने तो कडा कसा उतरला ते देखील कळले नाही . आम्ही शिडी उतरून जेव्हा दरी पार केली तेव्हा बंड्या आमची आणि लाल्याची वाट बघत उभा होता. थोड्या वेळात लाल्या दरी चढताना दिसला. मग ते दोघे आमच्या सोबत गडउतार होऊ लागले. आम्ही गडाच्या पहिल्या शिडीकडे आलो तेव्हा दुपारचे दोन वाजले होते. लाल्या परत एकदा मागे राहीला होता. बंड्या शिडीवरून खाली उतरताना कुयकुय करू.लागला. अमित त्याला खाली उचलून घेऊ पाहत होता पण तो मागे पळत होता. त्याला मागे सोडून आम्हाला खाली उतरायला कसेतरी वाटत होते . आम्ही थोडे खाली आल्यावर लाल्या आणि बंड्या खाली येताना दिसले. आम्हाला बरे वाटले. कदाचित लाल्यानेच बंड्या कुत्र्याला शिडीवरून खाली यायला मदत केली असणार.  आम्ही अर्धा अधिक गड उतरल्यावर दोन तरूण मुले गड चढताना दिसली. त्याबरोबर आमच्यासोबतच्या लाल्या आणि बंड्यामध्ये त्यांच्या भाषेत काहीतरी बातचीत झाली. लाल्या त्या मुलांसोबत परत गड चढू लागला आणि आमच्या सोबत बंड्या गड उतरू लागला. आपण इथे पाहू शकतो मुक्या प्राण्यांमध्ये पण किती शहाणपणा असतो. त्या दोन मुलांना सोबत करण्याची जबाबदारी लाल्याने घेतली होती आणि बंड्या आमच्यासोबत अगदी पायथा गावात येईपर्यंत सोबत राहीला होता.
आमची ही ट्रेक आमच्यासाठी खुपच अविस्मरणीय ठरली.

लेखक - नितीन द. राणे
सातरल - कणकवली.
९००४६०२७६८

No comments:

Post a Comment