Friday, 2 November 2018

©आमची माहुली किल्ला चढाई..

©आमची माहुली किल्ला चढाई..
२७.१०.२०१८

         तब्बल दोन महीन्याच्या विश्रांती नंतर परत एकदा ट्रेक करायची खुमखुमी आली. यावेळी आम्ही एकदा हुलकावणी दिलेल्या माहुली किल्ल्याची निवड केली. थंडीची चाहुल लागलीच होती आणि एक दिवस जोराचा पाऊस झाला. परत थंडी गायब. पण आमची ट्रेक काही रद्द करणार नव्हतो. मला २६ ऑक्टोबरच्या रात्री झोप काही लागली नाही. ४ वाजताचा अलार्म लावून झोपलो खरा पण जेव्हा तो वाजला तेव्हा कोणत्या प्रकारची झोप लागली कोणास ठाऊक ? आणि अचानक ५ वाजता जाग आली. खरंतर मला बदलापूरहून ५.०५ वाजताची ट्रेन पकडायची होती. पण सगळं मुसळ केरात. पहील्यांदाच माझ्यामुळे बाकीच्यांना उशीर होणार होता. पण आपले साथीदार समजूतदार असले कि सारं काही ठीक होते. या सर्व प्रकारामुळे आम्हाला सुमारे १ तास उशीर झाला. यावेळी रूपेश सावंत ऐवजी अमित गावडे सामील झाला होता. कल्पेश, मी , संतोष आणि अमित असे आम्ही चार जण माहुली सर करायला निघालो. आसनगांव पश्चिम वरून माहुली गावासाठी रिक्षा करून पायथा गावात पोचलो. हवेत थोडासा गारवा होता. जराही टंगळमंगळ न करता चढाईला सुरुवात केली. माहुली गडाच्या जंगलाच्या प्रवेशद्वारापाशीच आम्हाला अजून तीन साथीदार येऊन मिळाले. असे आमच्या प्रत्येक ट्रेकला घडते. एक तरी कुत्रा आमची सोबत करत असतो पण त्याची साथ काही अंतरापर्यंतच असते. ह्या तिघांनी आपापसात आपल्या भाषेत एकमेकांना सुचना देऊन आमच्या पुढे दोघेजण आणि एक कुत्रा मागे राहीला. त्यांना जणु देवानेच आमच्या रक्षणासाठी पाठवले असावे. आम्ही त्यांचे लगेच नामकरण केले. अंगाने धष्टपुष्ट असलेल्या लाल कुत्र्याला लाल्या, दुसऱ्या एका कडक्या लाल कुत्र्याला मोत्या आणि पांढरे काळे पट्टे असलेल्या कुत्र्याला बंड्या असे नाव दिले.

सुर्यदेव नुकतेच डोकावू लागले होते. चढाई सोपी असली तरी पायाखाली सरकणाऱ्या छोट्या दगडामुळे घसरायला होत होते. सुरूवातीला घनदाट जंगलातून जाताना छान वाटत होते. फक्त मच्छरचा त्रास खुप होता. आम्ही सकाळी ७.३० चढाई सुरूवात केली पण निसरड्या वाटेमुळे आमचा वेग मंदावत होता. जेव्हा जंगल संपून उघड्या माळावर आलो तेव्हा सकाळी सकाळी पण ऑक्टोबर गरमी काय असते त्याचा प्रत्यय येऊ लागला. लाल्याची खुपच दमछाक होत होती पण तो आमच्या पुढे राहत होता. त्याला थांबावेसे वाटले की तो मागे वळून आमच्याकडे पाहायचा. आम्हालाही चढाई दरम्यान विश्रांती हवीच होती. फोटोजनीक पॉईन्ट बघून आम्ही विश्रांती आणि फोटोसेशन आटपत होतो. सुर्याच्या सोनरी किरणात चकाकणारा माहुलीने आपली हिरवी दुलई केव्हाच सोडली होती. तो आपले कड्यातले रौद्ररूप दाखवत निश्चल उभा होता. त्याला न घाबरता त्याच्या डोळ्यात डोळे घालून चढणाऱ्या प्रत्येक पर्वतरोहीला त्याच्याकडे असलेला ऐतिहासिक खजिना दाखवणार होता. आम्ही जसं जसे चढत होतो तसं तशी आमची चढाई कठीण होत चालली होती. सुर्यदेव जराही कृपा करायला तयार नव्हते. प्रत्येकाने २ लिटर आणलेल्या पाण्याचे निम्मे कंझ्मप्शन अर्ध्या वाटेतच झाले होते. लाल्या आणि त्याच्या आप्तेष्टांना तहान लागली असावी ते जोरजोरात तोंडाने धपापत होते. आमच्या कडे पाणी असून पण आम्ही त्यांना ते भांड्याअभावी देऊ शकत नव्हतो. गडावर पाण्याचा भरपुर साठा असल्याचे कळले होते. आम्ही आमची पावले वाटेत येणाऱ्या प्रत्येक दगडात रोवत भरभर चालू लागलो. घामाने अंगावरील कपडे पार भिजून गेले होते. चढाई सुरू करून दोन तास होऊन गेले होते. माहुलीवरील मोठा झेंडा आता दृष्टीक्षेपात आला होता. झेंडा दिसताच आमची पावले जोर धरू लागली. आम्ही मध्येच एखाद्या झुडपाचा आधार घेऊन उन्हापासून बचाव करत होतो. आता शेवटचा टप्पा दिसत होता. माहुली ही ट्रेक कल्याण दरवाजा कडचा भाग सोडला तर फारशी कठीण नाही पण सोपी सुद्धा नक्कीच नाही. दरीच्या बाजूने जाणारी निमुळत्या वाटेत एका छोट्याशा चुकीमुळे दरीत गडप होण्याची वेळ येऊ शकते. लाल्या आणि कंपनीच्या सोबतीमुळे आम्हाला ट्रेकमध्ये खुप मजा येत होती. एका खाण्याच्या ब्रेकदरम्यान आमच्या पिशवीतून केळी निघाल्यावर लाल्या आणि कंपनी नाराज झाली होती. आम्ही त्यांची नाराजी ओळखून बिस्कीट पुडा बाहेर काढला. त्या बरोबर सगळ्यांच्या शेपट्या गोल फिरायला लागल्या. इथे आम्हाला प्रत्येक वेळेच्या अनुभवावरून वाटले की यांची साथ त्यांना खायला मिळाल्यावर संपेल. पण ते तिघे ही आमच्यासोबत पुढे निघाले. शेवटच्या टप्प्यावर गडाचा कडा पार करण्यासाठी एक लोखंडी शिडी चढायची होती. खरी गम्मत आता येणार होती. आम्ही चौघेजण शिडी चढून वर आलो. आमच्या जेव्हा मागोमाग लाल्या आणि बंड्या जोडीने शिडी चढायला लागले तेव्हा तो प्रसंग बघण्यासारखा होता. बघता बघता दोघांनी ती शिडी पार केली. पण मोत्या कुत्र्याने आपली ट्रेक तिथेच संपवून आमच्याकडे पाहत खाली बसला. आम्ही गडावर पोचलो तेव्हा साडेदहा वाजले होते. तब्बल तीन तासाच्या चढाई नंतर हा क्षण अनुभवायला मिळाला होता. तिथे आम्ही नाष्टा करून गड फिरायला निघालो. गडावरील विस्तीर्ण पठारामुळे एका दिवसात गड फिरून होत नाही.
गडाच्या उजव्या हाताकडून थोडे वरच्या बाजूला गेल्यावर एक पाण्याचे टाके दिसते. तिथून दोन वाटा फुटतात त्यातली डावी कडची एक वाट कदाचित हनुमान दरवाजा कडे जात असावी ( जो वेळे अभावी आम्हाला पाहता नाही आला) आणि दुसरी वाट जाते ती वरच्या बाजूला. तिथून वरच्या बाजूने चालत गेल्यानंतर अजून एक डाव्या बाजूला वाट जाते. इथे मात्र दिशादर्शक फलक लावलाय. डाव्या साईडला जाणाऱ्या वाटेच्या दिशेला महादेवाचे मंदीर आणि शिवतलाव असे लिहीले आहे. पण आम्ही सुरूवातीला तिकडे न वळता सरळ पठाराच्या दिशेने अशासाठी चालत गेलो कि खरंतर गडावरचा सगळा परिसर आम्हाला पाहायचा होता.
त्यामुळे आम्ही भरभर चालत पठारावरील मळलेल्या वाटेने पुढे जात होतो. दूरपर्यंत कोणतीच पाहण्याजोगे वास्तू कींवा ठिकाण दिसत नव्हते. आमच्या गटातील तिघांनी पुढे न जाण्याचा निर्णय घेतला. पण माझे मन मला तसं करण्यापासून थांबवत होते. त्यांना तिथेच बसायला सांगून पुढे काही दिसते का पाहायला मी भराभरा चालत निघालो. पुढे जात असताना गडाच्या तटबंदी बाजूने एक वाट खालच्या बाजूला गेलेली दिसली. मी सहज नजर टाकली तर खाली पुरातन बांधकाम दिसले. मी लगेच बाकीच्या साथींदारांना बोलावून घेतले. आम्ही सर्वजण खाली उतरून पाहतो तर एक स्वच्छ पाण्याचे चौकोनी जलकुंड वाहत होते , बाजूला एका गर्द झाडाखाली महादेवाची पिंडी त्यावर पितळेच भांडे पाहून मनाला शांती मिळाली. त्या समोरच दिमाखात बसलेले आपले महाराज. तिथून खाली गेल्यावर माहुली कील्ल्याचा महादरवाजा दिसला. पण त्याची खुपच पडझड झालेली आहे. दरवाजातून खाली गडउतार होणारी वाट पार उध्वस्त झाली असल्यामुळे त्या बाजूने उतरता येत नाही. या महादरवाजाच्या आजूबाजूचे तटबंदी बांधकाम आजही मजबूत स्वरूपात आहे. महादरवाजाच्या आतल्या दोन्ही बाजूला दगडात कोरलेल्या छोट्या छोट्या गुहा आहेत. गुहांचे कोरीव काम पाहण्याजोगे आहे. शिवाय दगडी दरवाज्यावरील कमान सुबक नक्षीकाम आजही चांगल्या स्थितीत आहे. जलकुंडातून येणाऱ्या पाण्याने तहान भागवून बराच वेळ तिथे घालवला आणि आम्ही शिवतलाव आणि महादेवाचे मंदीर पाहण्यासाठी गडाच्या दुसऱ्या टोकाला निघालो. कल्याण दरवाजा बद्दल खुप ऐकून होतो तोही पाहायचा असल्याने आमची पावले झपाझप पडत होती. आता डोक्यावरच्या उन्हाचा त्रास जाणवत नव्हता.

माहुली गडा पठारावर वाटा जरी नीट असल्या तरी वाटांच्या बाजूला बरीच झाडेझुडपे वाढलेली आहेत. जागोजागी पडक्या वाड्यांच्या खुणा आढळतात. शिवाय दिपस्तंभाचे अवशेष ही काही ठिकाणी दिसतात. आम्ही काही वेळातच महादेवाच्या पडक्या मंदिराच्या ठिकाणी पोचलो. मंदिराची झालेली पूर्ण पडझड पाहून मन विषन्न होते. मंदिराच्या समोरच स्वच्छ नितळ पाण्याचा शिवतलाव आहे. तिथे काही क्षण घालवून आम्ही कल्याण दरवाजा कडे प्रस्थान केले. कल्याणदरवाजाच्या वाटेवरून थोडे पुढे गेल्यावर खालच्या बाजूला हनुमान दरवाजाकडे जाणाऱ्या मार्गाचा मार्गदर्शक फलक लावला आहे. हनुमान दरवाजा शेवटी पाहू असे ठरवत आम्ही पुढे निघालो. थोडे चालल्यानंतर एक छोटीशी आडवी दरी लागली ती पार कडून चढून वरच्या बाजूला जायचे होते. वर चढून जायला एका कड्याला एकावर एक अशा दोन शिड्या लावलेल्या दिसल्या. आम्हाला वर चढून जायला काही कठीण नव्हते पण आमच्या सोबतच्या लाल्या आणि बंड्याला शिडीवरून कसे चढता येणार हा प्रश्न होता. आम्ही वर चढल्याबरोबर दोघेही कुय कुय करू लागले. त्यांचा प्रवास तिथेच संपणार होता. मी माझ्या जवळचा अर्धा पुडा त्यांच्यासमोर खाली करत आम्ही आमच्या पुढच्या मार्गाला लागलो.
काही वेळातच पठारावरील गर्द झाडीच्या रानातून चालत कल्याण दरवाज्याच्या वरच्या बाजूला पोचलो. ही पठारावरील वाट एक भुलभुलय्याच आहे. पण ती चांगली मळलेली असल्यामुळे सहसा चुकायला होत नाही. कल्याण दरवाजाच्या वरच्या बाजूला आलो खरे पण कल्याण दरवाजा पर्यंत उतरणे थोडे धोकादायक होते. माझ्या सोबतच्या तिघांनी आपली निवृत्ति जाहीर केली. पण माझं पण मला स्वस्थ बसू देईना. दरीच्या बाजूने एका निमुळत्या वाटेने दरवाज्याच्या दिशेने उतरू लागलो. पायाखालचे सुकलेले गवतावरून पाय सरकण्याची शक्यता जास्त होती. त्यानंतरचा एक छोटासा रॉक पॅच शरीर थोडेसे हवेत ठेवत उतरलो. जेव्हा जमिनीला पाय लागले तेव्हा जीवात जीव आला. एक छोटीशी चूक खुप काही करू शकते. कारण जेवढा वेळ माझं शरीर हवेत होतं तेवढा वेळ मनात भीती होती. लगेचच एका चिंचोळ्या वाटेने छोट्याशा दरवाजाकडे पोचलो. तिथून कल्याणचा महाकाय दरवाजा आणि त्यापुढील उध्वस्त पायऱ्या समोर असणाऱ्या दरीची भयावहता दाखवत होते. मला त्या उध्वस्त पायऱ्यांपर्यंत पोहोचायचे होते. पण मी ज्या छोट्या दरवाजाच्या इथे बसलो होतो तो पण मोडकळीस आला होता. वरचा भाग कधी पडेल याची शाश्वती नव्हती. मी तिथून सरकून खाली उतरण्यासाठी धडपड करू लागलो आतापर्यंत कधी कोणतीही ट्रेक अर्धवट ठेवली नव्हती. कातळकड्याच्या बाजूने थोडे पुढे चालत गेल्यावर समोर वेगळेच आव्हान उभे होते. कल्याण दरवाजाकडे उतरायला एक जाडा बांबू उभा करून ठेवला होता. त्या सोबत काळ्या रंगाची वायर कड्याला हूक मारून बांधून ठेवली होती. मी जवळ जावून पाहीले तर जाडा बांबूची अवस्था डळमळीत दिसली. मी कधीही Calculated Risk घेतो. एकंदरीत बांबूची अवस्था पाहता त्याला पकडून मला खाली उतरण्याचा धीर झाला नाही. उतरताना एक जरी चुक झाली असती तर सरळ दरीत कपाळमोक्ष होता. वरच्या पठारावरून माझा सहकारी कल्पेश मला हाक मारत होता. तो जेव्हा जेव्हा माझ्यासोबत ट्रेकला आलाय प्रत्येक वेळी त्याने माझी काळजी घेतलीय. मी जरा जरी धोकादायक ठिकाणी गेलो तर त्याची हाक पहीली असते. त्याच्यामुळे मीही आवरते घेतले. परत कधी जमले तर नक्की कल्याण दरवाजाला भेट देईन अस मनाशी बोलत परत एकदा कल्याण दरवाजा कडचा भाग डोळ्यात साठवत पठाराच्या दिशेने चढायला सुरुवात केली. मी पठारवर आलो तेव्हा लाल्याला तिथे बघून आश्चर्यचकीत झालो. लाल्या तो दरीकडचा कडा कसा चढून आला असेल? खरचं त्याने आम्हाला शेवटपर्यंत साथ केली होती.

आम्ही सोबत.आणलेल्या शिदोरीवर यथेच्छ ताव मारत आम्ही परतीच्या वाटेला लागलो. गडावरचा परीसर डोळ्यात साठवत गड उतरायला सुरुवात केली. येताना पण लाल्या मागे राहीला त्यामुळे त्याने तो कडा कसा उतरला ते देखील कळले नाही . आम्ही शिडी उतरून जेव्हा दरी पार केली तेव्हा बंड्या आमची आणि लाल्याची वाट बघत उभा होता. थोड्या वेळात लाल्या दरी चढताना दिसला. मग ते दोघे आमच्या सोबत गडउतार होऊ लागले. आम्ही गडाच्या पहिल्या शिडीकडे आलो तेव्हा दुपारचे दोन वाजले होते. लाल्या परत एकदा मागे राहीला होता. बंड्या शिडीवरून खाली उतरताना कुयकुय करू.लागला. अमित त्याला खाली उचलून घेऊ पाहत होता पण तो मागे पळत होता. त्याला मागे सोडून आम्हाला खाली उतरायला कसेतरी वाटत होते . आम्ही थोडे खाली आल्यावर लाल्या आणि बंड्या खाली येताना दिसले. आम्हाला बरे वाटले. कदाचित लाल्यानेच बंड्या कुत्र्याला शिडीवरून खाली यायला मदत केली असणार.  आम्ही अर्धा अधिक गड उतरल्यावर दोन तरूण मुले गड चढताना दिसली. त्याबरोबर आमच्यासोबतच्या लाल्या आणि बंड्यामध्ये त्यांच्या भाषेत काहीतरी बातचीत झाली. लाल्या त्या मुलांसोबत परत गड चढू लागला आणि आमच्या सोबत बंड्या गड उतरू लागला. आपण इथे पाहू शकतो मुक्या प्राण्यांमध्ये पण किती शहाणपणा असतो. त्या दोन मुलांना सोबत करण्याची जबाबदारी लाल्याने घेतली होती आणि बंड्या आमच्यासोबत अगदी पायथा गावात येईपर्यंत सोबत राहीला होता.
आमची ही ट्रेक आमच्यासाठी खुपच अविस्मरणीय ठरली.

लेखक - नितीन द. राणे
सातरल - कणकवली.
९००४६०२७६८

Sunday, 2 September 2018

मांजुरकी

मांजुरकी

       मांजर आमच्या कोकणातील घराघरात एक अविभाज्य भाग बनून गेलयं. म्हणतात कुत्र्यापेक्षा मांजर वाईट. पण असं नाहीये. माझ्या मते पाळीव कुत्र्याला कितीही मारले तरी आपल्या माणसांवर कधीच पलटवार करत नाही. त्याच्यामध्ये प्रेम आणि सहनशीलता जास्त आहे. याउलट मांजराला तुम्ही कोंडून ठेवा, त्याला मारा. ती आपले पंजे दाखवतेच. म्हणजे तेंच्यात स्वतावर अन्याय सहन करण्याची पद्धतच नाही. म्हणून ती प्रेमळ नाही असं नाही. तिला प्रेम दिलेत दसपटीने ते ती परत करेल. याचा अनुभव आम्हाला हल्लीच आला. आमच्या गावी माझ्या वडिलांना कुत्रे मांजर पाळायची जाम हौस होती. चार चार मांजरे, पाच सहा कुत्रे आमच्याकडे असायचीच. आपल्या ताटातला घास कमी करून ते कुत्र्या मांजराना घालायचे. जेव्हा ते आपल्या ताटातल्या अख्ख्या माशाच्या तुकड्या माजरांच्या पुढ्यात टाकायचे तेव्हा आमचा जीव जळायचा. त्यांना ते कळायचे. मग आम्हालाही ते आपल्या ताटातले द्यायला मागेपुढे बघायचे नाहीत. बाबा गेले आणि सारं काही कमी झाले. ज्या दिवशी बाबा गेले त्या दिवशी सगळी कुत्री एका कोनात शांत बसून आसवं ढाळत होती. प्रेतयात्रेला जमलेल्या एकाही माणसाला ती भुंकली नव्हती. एरव्ही आमच्या येणारा अनोळखी माणूस विचार करून यायचा, भुंकून भुंकून येणाऱ्या माणसाचा जीव अर्धा करायची. मला चांगले आठवते मी गावी नोकरी करत असताना सकाळी सहा वाजता उठून काजू आणायला रानात जायचो. बाकी सगळी कुत्री बाबांसोबत जायची पण नव्यानेच आणलेला आमचा ' टिलू ' कुत्रा माझ्यासोबत सकाळीच रानात यायचा. माझे काम होईपर्यंत माझ्या सोबत राहायचा. जणू माझा सखा सोबतीच होता तो. सांगायचा मुद्दा कोणताही प्राणी वाईट नसतो. त्याला प्रेम दिले तर त्याबदल्यात प्रेमच मिळते.
मांजराच्या बाबतीतही काळीज हेलावून टाकणारा प्रसंग आमच्या घरात घडला. काय झाले. पहील्यांदाच आम्ही गावचे घर कायमचे बंद करून मुंबईला यायला निघालो होतो. आम्हाला किंबहूना माझ्या आईलाच आमच्या घरी पाळलेल्या मांजरीची जास्त काळजी लागून राहीली होती. तिचे पुढे कसं होईल. हाच प्रश्न पडला होता. शेजारीच राहणाऱ्या काकींना सांगून आम्ही निघालो. जणू त्या मांजरीला याची कुणकुण लागली होती. सकाळपासूनच तिचे डोळे पाण्याने डबडबले होते. आम्ही तिला जवळ घेऊन धीर द्यायचो पण ती हळू आवाजात मँव करायची. जणू काही ती आम्हाला काहीतरी सांगत होती. त्या आवाजात एक प्रकारचे कारूण्य होते. आम्ही संध्याकाळी साडे चार वाजता निघणार होतो. त्या अगोदरच ती कुठे दिसेनाशी झाली. निघताना तिचा निरोपही घेता आला नाही. आम्ही मुंबईला आल्यानंतर कामाच्या गडबडीत आम्ही तिला विसरूनही गेलो. पण आमची आई विसरली नव्हती. आठ दहा दिवसानी आम्ही गावी फोन लावला तर ती आमच्या शेजारच्या काकींकडे सुखरूप होती. आम्ही सुटकेचा निस्वास सोडला. काळजी मिटली होती. पण खरा प्रकार मध्यंतरी आमचा दादा जेव्हा गावी गेला तेव्हा कळला.
झालं असं होतं, आम्ही मुंबईला निघून आल्यावर चार पाच दिवसानंतर आमच्या शेजारची काकी आमची मांजरी कुठे दिसेना म्हणून आमच्या पडवीच्या खिडकी जवळ येऊन मांजरीला हाक मारू लागली. बराच वेळ काहीच रिस्पॉन्स येईना. तिने खुप  हाका मारल्या पण काहीच हालचाल दिसेना. काकी तिथून निघणार इतक्यात एक अस्पष्ट मँव तिला ऐकायला आले. तिने परत तिला बोलवायला सुरूवात केली. तशी ती आतून धडपडत बाहेर आली. पण उंबरठ्याच्या बाहेर येईना. चार पाच दिवसाच्या उपवासाने तिची तब्बेत खुपच खालावली होती. पोट आणि डोळे आत गेले होते. तिला नीट उभे राहताही येत नव्हते. आमची काकीने तिला खुप बोलवून पाहीले पण ती जागची हलत नव्हती. तिच्या मनात भीती असावी. कारण शेजारच्या काकीकडे गेली कि काकी तिला मारायची. कारण ती त्यांच्या घरी जाऊन उपद्व्यापही तसेच करायची.
शेवटी काकीने आपल्या घरी जाऊन तिच्या साठी दुधभात आणला. तो दाखवून तिला बोलवू लागली. पण ती जागची  हलेना. काकीला तिची हालत बघवत नव्हती. काकीला अचानक काही आठवले.
"बाय तुका अजिबात मारूचय नाय" असे काकी म्हणाल्याबरोबर हळूहळू ती खिडकीकडे येऊ लागली. काकीने दुधभाताची वाटी खिडकीवर ठेवली पण तिला वर चढायचे देखील त्राण नव्हते. शेवटी ती वाटी काकीने सावकाशपणे खिडकीखाली ठेवली तेव्हा भुकलेली माऊ हळूहळू खाऊ लागली. सुरूवातीला तिला खाताच येत नव्हते. जणू ती खायलाच विसरली होती. दोन तीन वेळा असं खायला घातल्यावर तिच्या अंगात बळ आले. आता ती शेजारच्या काकीकडे असते. आम्ही आता गेल्यावर ओळखेल की माहीत नाही. पण ती खालेल्या अन्नाला जागली होती. तिने आपला स्वाभिमान सोडला नव्हता. अशी ही आमच्या मांजरीची मांजरूकी.

समाप्त...
लेखक - नितीन राणे
सातरल -कणकवली
९००४६०२७६८.

Monday, 18 June 2018

ट्रेक रामशेजची.

©ट्रेक रामशेजची आणि देहेरगडाची

भाग - पहिला... "रामशेज"

        १७ जून, २०१८ हा दिवस माझ्या आयुष्यात कायमचा कोरला गेलाय. साधी चूक पण कशी महागात पडू शकते याचे उदाहरण आणि एका दिवसात केलेल्या दोन ट्रेक या दोन गोष्टीमुळे हा दिवस कायम लक्षात राहीला.

        आम्ही १६ जूनच्या संध्याकाळी पंचवटी एक्स्प्रेसने मुंबईहून १३ जण नाशिककडे निघालो. १६ जणांमध्ये मी, अजिंक्य, सुजाता, साधना, अनिता, सोनाली, पवन, अमोल, सुमित , शुभम, अविनाश, वैभव, शहाजी, सुमित, गणेश आणि हनुमंत असे होतो. गेले आठ दिवस लपलेला वरुण देव शनिवारच्या सकाळपासूनच लाजत लाजत का होईना पण समोर येऊ लागला. मात्र उन पावसाच्या खेळात आमची धाकधूक मात्र वाढवत होता. या मान्सून मधली पहीली ट्रेक आणि पाऊस नाही असे व्हायला नको होते. पण तसे काहीही झाले नाही मुंबई मध्ये शनिवारी दुपारपासून पावसाला बऱ्यापैकी सुरुवात झाली होती. संध्याकाळी सहा वाजताचे काळ्याकुट्ट ढगांचे वातावरण आमचा उत्साह वाढवत होता. आमची ट्रेन वेळेत निघाली. ट्रेकमध्ये नवीन ट्रेकर्सच्या ओळखी, गप्पागोष्टी करत आम्ही नाशिकला रात्री दहा वाजता पोहोचलो. आमचे नाशिकचे परममित्र पवन आणि अविनाश आम्हाला न्यायला स्टेशनला हजर होते. तिथून आम्ही सर्वजण रामशेज - आशेवाडी या पायथा गावाकडे निघालो. रात्री आमची राहण्या खाण्याची सोय आमच्या नाशिकच्या मित्रांनी आणि श्री. उत्तम बोडके सर यांनी खुप चांगल्या पद्धतीने केली होती. आम्ही गेलो त्या गावात या मोसमातला पाऊस अद्यापही पडला नव्हता. पण वातावरणातील कमालीचा गारवा मनाला सुखावत होता. रात्रीचे जेवन आटपून आम्ही सकाळी ४.३० वाजता उठण्यासाठी झोपलो.

पहीली ट्रेक " रामशेज " ची होती. मुंबई हून १३ आणि नाशिक वरून ३ जण , असे मिळून आमचा १६ जणांचा ग्रुप या ट्रेक साठी तयार झाला. सकाळी चहा पाणी आटोपल्यावर बरोबर सहा वाजता ट्रेकला सुरूवात केली. ही अत्यंत सोप्या पद्धतीची ट्रेक होती. आम्ही ज्या ठिकाणी थांबलो होतो त्या ठिकाणाहून रामशेज स्पष्ट किल्ला दिसत होता. कातळमाथाल्या डावीकडून वळसा मारल्यानंतर गडाला जाण्याऱ्या पायवाटेला लागलो. गडावर जाताना वाटेत एक गुहा लागली. चढाई करताना काही ठिकाणची वाट वगळता बाकी मार्ग सुरक्षित पायऱ्यानी बनविला आहे.

आम्ही गुहेजवळ पोहोचलो. गुहेतील राममंदीरात प्रभू राम ,सीतामाई, अंजनीसूत यांच्या मूर्ती शिवाय श्री दत्त महाराजांची मुर्ती व पादुका आणि एका देवीचे स्थान आहे. शिवाय शिवाजी महाराजांचा मोठा फोटोही आत आढळतो. हे मंदीर संपुर्ण कातळात कोरलेले असून मंदिराच्या बाहेरच्या भागात पण खुप जागा आहे. तसेच मंदीराच्या एका बाजूला बंद लाकडी दरवाज्या असलेली एक खोलीही आढळते. तसेच एका ठिकाणी शिलालेख कोरलेला दिसून येतो. मंदीराच्या दुसऱ्या बाजूने गेल्यास एक पाण्याचे टाक आढळते ज्यात अजूनही पाणी आहे. हे पाण्याचे टाक मंदीराच्या बरोबर खाली आहे. पावसाळ्यात ते पूर्ण भरून जाते. त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. मंदीराकडून वर सरकल्यावर लगेचच रामशेजचे पठार दृष्टीस पडते. रामशेज किल्ल्याचा विस्तार फार मोठा नाही. मात्र गडावर पाण्याच्या टाक्या असून वाड्याचे जोते आहेत. तसेच गडावरून गंजकरंग, वाघेरा, देहेरगड- बोरगड व सातमाळा रांग बघता येते.

आम्ही राजशेज पठारावर पोचलो तेव्हा सुर्यनारायण आपल्या लालबुंद किरणातून आपले अस्तित्व दाखवत होते. त्या वेळच्या रंगछटा मन तृप्त करत होत्या.
गडावर पोचल्यावर गडाच्या डाव्या बाजूला कोरीव काम केलेली लांबच्या लांब लॉबी व मध्ये एक दरवाजा दिसला. थोडे पुढे गेल्यावर एका ठिकाणी एक गुप्त मार्ग दिसला. त्या मार्गाच्या शेवटच्या पायरीवर एक छिद्र आढळले. साधारण एक लहान मुल आरामशीर या छिद्रातून खाली जाऊ शकते. या छिद्रातून खाली डोकावले तर महादेवाची पिंडी दृष्टीस पडते.

       तिथून आम्ही मागे फिरल्यावर गडाच्या दोन्ही टोकांमधील भागात येऊन पोहोचलो. हा भाग बराचसा अरुंद आहे. समोरच बुजलेल्या अवस्थेत गुप्त दरवाजा दिसला. या वाटेने खाली गेल्यावर आम्हाला समोर देहेरच्या किल्ल्याचे दर्शन झाले. पेठ रोडने चालणारी दूरवरची वाहतूक येथून न्याहाळता आली. गुप्त दरवाजाच्या वर जाणारी वाट रामशेजच्या दुसर्‍या टोकाकडे जाते व डावीकडची वाट थेट गडाच्या माचीकडे अर्थात, मुख्य बुरुजाकडे जाते. उजवीकडच्या वाटेने थोडे पुढे गेल्यास काही पायर्‍या दिसून येतात. एका कड्यावर या पायर्‍यांची रचना केलेली आहे. येथे समोरच किल्ल्याचा मुख्य दरवाजा दिसून येतो. आज या दरवाजाची अवस्था खराब झालेली आहे व बाहेर पडण्याच्या वाटाही बंद झाल्या आहेत. येथून खाली जाण्यासाठी केवळ एका मनुष्याचा रस्ता दिसून येतो. दरवाजा पाहून मुख्य वाटेला आल्यावर समोर मोठा ध्वजस्तंभ नजरेस पडतो. शंभू छत्रपतींच्या जन्मदिनी येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. ध्वजस्तंभ हा किल्ल्याच्या मुख्य बुरुजावर उभारलेला आहे. या ठिकाणी उंच कडा आहे. खाली आशेवाडी गाव दिसते. सुमारे चार-पाच कि.मी. अंतरावर चामर लेणींचा डोंगर दृष्टीस पडतो. त्याहीपलीकडे दूरदूर पांडवलेणींचा डोंगर दिसतो. वातावरण स्वच्छ असेल, तर उजव्या बाजूला दूरवर अंजनेरी व ब्रह्मगिरीचे पर्वत न्याहाळता येतात. बरेच हौशी ट्रेकर्स रामशेज व चामर लेणींचा ट्रेक एका दिवसात पूर्ण करतात.

आम्ही किल्ल्याच्या दुसर्‍या टोकाकडे जाण्यासाठी माचीवरून परत मागे फिरलो. या टोकाचा परिसर पहिल्यापेक्षा अधिक उंचवट्याचा आहे. थोडे वर चढून आल्यावर आपण एका सपाटीवर येऊन पोहोचतो. येथे पाण्याची दोन टाकी व एक छोटा तलाव आहे. तलावापासून थोडे पुढे चालत गेल्यास एक देवीचे मंदिर दृष्टीस पडते. देवीभक्तांचे येथे सतत येणे-जाणे असावे, असे तेथील पाऊलखुणांवरून दिसून येते. नवरात्रात येथे मोठा उत्सवही होत असतो. मंदिराच्या मागच्या बाजूस पुन्हा उतार चालू होतो. गडाचा दुसरा गुप्त दरवाजा याच ठिकाणी आहे. दुसर्‍या टोकाशीही दोन पाण्याची टाकी दिसून येतात. या माथ्यावर अनेक पडक्या घरांचे अवशेष विखुरलेले आहेत. मागील बाजूला मोठे उतरते पठार आहे. त्यास वळसा घातल्यास किल्ल्याच्या या टोकाचा घेर ध्यानात येतो. समोरच टेहळणीसाठी वापरण्यात येणारा भोरगड नजरेस पडतो. नाशिक-पेठ रस्त्याचे पूर्ण दर्शन या भागातून होते. या टोकाच्या उजव्या बाजूला काही भग्न मूर्ती व पिंडीचे अवशेष दिसून येतात.

रामशेज पाहताना एक गोष्ट मात्र ध्यानात येते की, या किल्ल्याची रचना ही साधीच आहे. परंतु तरीही मराठ्यांनी साडेपाच वर्षे हा किल्ला झुंजत ठेवला होता, यावरूनच त्यांच्या पराक्रमाची प्रचिती येते. किल्ल्यावरील अवशेष मात्र पडझडीत नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. रामशेज किल्ला हा नाशिक शहराच्या उत्तरेला १४ कि.मी. अंतरावर आहे. नाशिकजवळच्या दिंडोरी पासून हा १० मैलाच्या अंतरावर आहे. प्रभू श्रीराम या किल्ल्यावर विश्रांतीला जायचे, आणि तिथे त्यांची शेज आहे म्हणून या किल्ल्याला रामशेज असे नाव पडले. सह्याद्रीच्या रांगेतील बरेचसे किल्ले घनदाट जंगलात आहेत, डोंगर दर्‍यांमध्ये वसलेले आहेत. परंतु रामशेज हा किल्ला एका सपाट आणि मोकळ्या मैदानावर आहे. किल्लाच्या जवळपास झाडी, जंगल देखील नाहीये. रामशेज किल्ल्याजवळ एकमेव किल्ला म्हणजे त्र्यंबकगड परंतु तो देखील ८ कोस अंतरावर होता आणि ७ किमी वर देहेरगड हा किल्ला आहे.( या किल्ल्याची ट्रेकची माहीती पुढे देणार आहे ) देहेरगड आणि भोरगड हे दोन वेगवेगळे किल्ले आहेत. पण दॊन्ही किल्ले एकमेकांना लागूनच आहेत. ही सर्व परिस्थिती पाहता किल्ला अगदी एकाकी आहे.

किल्यावरचे वातावरण खुपच आल्हाददायक होते.
संपुर्ण किल्ला पाहून झाल्यावर आम्ही किल्ल्याच्या मध्यभागी खडकाच्या आडोशाला दगडाची चुल करून माझ्या ट्रेक लाईफ मधली गडावर प्रथमच maggy बनवायला सुरूवात केली. या कामी आमच्या ग्रुप लिडर सुजाताजी, पवन, साधना , वैभव आणि शहाजींची यांच्या महतप्रयासाने (महतप्रयास यासाठी बोलतोय की जी Maggy  बनवायला दोन मिनिटे लागतात असे बोलले जाते पण तिला गडावरील वारा आणि पडून गेलेल्या पावसामुळे अर्धा पाऊन तास लागला) अत्यंत चवदार आणि गरमागरम Maggy आम्हाला चाखता आली. माझी खुप दिवसांपासूनची इच्छा या ट्रेकला पुर्ण झाली.
नंतर थोडावेळ किल्ल्यावर वर थांबून आम्ही गड उतरायला सुरुवात केली. कारण आम्हाला दुसऱ्यासाठी लगेचच निघायचे होते. एक अविस्मरणीय क्षण मनात साठवत आम्ही आमच्या निवासस्थानी सकाळी १० वाजता पोहोचलो.

समाप्त...

देहेरगडाचा थरार - भाग दुसरा लवकरच....

लेखक - नितीन राणे
सातरल - कणकवली
सध्या वास्तव्य -बदलापूर
मोबाईल - ९००४६०२७६८