मांजुरकी
मांजर आमच्या कोकणातील घराघरात एक अविभाज्य भाग बनून गेलयं. म्हणतात कुत्र्यापेक्षा मांजर वाईट. पण असं नाहीये. माझ्या मते पाळीव कुत्र्याला कितीही मारले तरी आपल्या माणसांवर कधीच पलटवार करत नाही. त्याच्यामध्ये प्रेम आणि सहनशीलता जास्त आहे. याउलट मांजराला तुम्ही कोंडून ठेवा, त्याला मारा. ती आपले पंजे दाखवतेच. म्हणजे तेंच्यात स्वतावर अन्याय सहन करण्याची पद्धतच नाही. म्हणून ती प्रेमळ नाही असं नाही. तिला प्रेम दिलेत दसपटीने ते ती परत करेल. याचा अनुभव आम्हाला हल्लीच आला. आमच्या गावी माझ्या वडिलांना कुत्रे मांजर पाळायची जाम हौस होती. चार चार मांजरे, पाच सहा कुत्रे आमच्याकडे असायचीच. आपल्या ताटातला घास कमी करून ते कुत्र्या मांजराना घालायचे. जेव्हा ते आपल्या ताटातल्या अख्ख्या माशाच्या तुकड्या माजरांच्या पुढ्यात टाकायचे तेव्हा आमचा जीव जळायचा. त्यांना ते कळायचे. मग आम्हालाही ते आपल्या ताटातले द्यायला मागेपुढे बघायचे नाहीत. बाबा गेले आणि सारं काही कमी झाले. ज्या दिवशी बाबा गेले त्या दिवशी सगळी कुत्री एका कोनात शांत बसून आसवं ढाळत होती. प्रेतयात्रेला जमलेल्या एकाही माणसाला ती भुंकली नव्हती. एरव्ही आमच्या येणारा अनोळखी माणूस विचार करून यायचा, भुंकून भुंकून येणाऱ्या माणसाचा जीव अर्धा करायची. मला चांगले आठवते मी गावी नोकरी करत असताना सकाळी सहा वाजता उठून काजू आणायला रानात जायचो. बाकी सगळी कुत्री बाबांसोबत जायची पण नव्यानेच आणलेला आमचा ' टिलू ' कुत्रा माझ्यासोबत सकाळीच रानात यायचा. माझे काम होईपर्यंत माझ्या सोबत राहायचा. जणू माझा सखा सोबतीच होता तो. सांगायचा मुद्दा कोणताही प्राणी वाईट नसतो. त्याला प्रेम दिले तर त्याबदल्यात प्रेमच मिळते.
मांजराच्या बाबतीतही काळीज हेलावून टाकणारा प्रसंग आमच्या घरात घडला. काय झाले. पहील्यांदाच आम्ही गावचे घर कायमचे बंद करून मुंबईला यायला निघालो होतो. आम्हाला किंबहूना माझ्या आईलाच आमच्या घरी पाळलेल्या मांजरीची जास्त काळजी लागून राहीली होती. तिचे पुढे कसं होईल. हाच प्रश्न पडला होता. शेजारीच राहणाऱ्या काकींना सांगून आम्ही निघालो. जणू त्या मांजरीला याची कुणकुण लागली होती. सकाळपासूनच तिचे डोळे पाण्याने डबडबले होते. आम्ही तिला जवळ घेऊन धीर द्यायचो पण ती हळू आवाजात मँव करायची. जणू काही ती आम्हाला काहीतरी सांगत होती. त्या आवाजात एक प्रकारचे कारूण्य होते. आम्ही संध्याकाळी साडे चार वाजता निघणार होतो. त्या अगोदरच ती कुठे दिसेनाशी झाली. निघताना तिचा निरोपही घेता आला नाही. आम्ही मुंबईला आल्यानंतर कामाच्या गडबडीत आम्ही तिला विसरूनही गेलो. पण आमची आई विसरली नव्हती. आठ दहा दिवसानी आम्ही गावी फोन लावला तर ती आमच्या शेजारच्या काकींकडे सुखरूप होती. आम्ही सुटकेचा निस्वास सोडला. काळजी मिटली होती. पण खरा प्रकार मध्यंतरी आमचा दादा जेव्हा गावी गेला तेव्हा कळला.
झालं असं होतं, आम्ही मुंबईला निघून आल्यावर चार पाच दिवसानंतर आमच्या शेजारची काकी आमची मांजरी कुठे दिसेना म्हणून आमच्या पडवीच्या खिडकी जवळ येऊन मांजरीला हाक मारू लागली. बराच वेळ काहीच रिस्पॉन्स येईना. तिने खुप हाका मारल्या पण काहीच हालचाल दिसेना. काकी तिथून निघणार इतक्यात एक अस्पष्ट मँव तिला ऐकायला आले. तिने परत तिला बोलवायला सुरूवात केली. तशी ती आतून धडपडत बाहेर आली. पण उंबरठ्याच्या बाहेर येईना. चार पाच दिवसाच्या उपवासाने तिची तब्बेत खुपच खालावली होती. पोट आणि डोळे आत गेले होते. तिला नीट उभे राहताही येत नव्हते. आमची काकीने तिला खुप बोलवून पाहीले पण ती जागची हलत नव्हती. तिच्या मनात भीती असावी. कारण शेजारच्या काकीकडे गेली कि काकी तिला मारायची. कारण ती त्यांच्या घरी जाऊन उपद्व्यापही तसेच करायची.
शेवटी काकीने आपल्या घरी जाऊन तिच्या साठी दुधभात आणला. तो दाखवून तिला बोलवू लागली. पण ती जागची हलेना. काकीला तिची हालत बघवत नव्हती. काकीला अचानक काही आठवले.
"बाय तुका अजिबात मारूचय नाय" असे काकी म्हणाल्याबरोबर हळूहळू ती खिडकीकडे येऊ लागली. काकीने दुधभाताची वाटी खिडकीवर ठेवली पण तिला वर चढायचे देखील त्राण नव्हते. शेवटी ती वाटी काकीने सावकाशपणे खिडकीखाली ठेवली तेव्हा भुकलेली माऊ हळूहळू खाऊ लागली. सुरूवातीला तिला खाताच येत नव्हते. जणू ती खायलाच विसरली होती. दोन तीन वेळा असं खायला घातल्यावर तिच्या अंगात बळ आले. आता ती शेजारच्या काकीकडे असते. आम्ही आता गेल्यावर ओळखेल की माहीत नाही. पण ती खालेल्या अन्नाला जागली होती. तिने आपला स्वाभिमान सोडला नव्हता. अशी ही आमच्या मांजरीची मांजरूकी.
समाप्त...
लेखक - नितीन राणे
सातरल -कणकवली
९००४६०२७६८.