©ट्रेक रामशेजची आणि देहेरगडाची
भाग - पहिला... "रामशेज"
१७ जून, २०१८ हा दिवस माझ्या आयुष्यात कायमचा कोरला गेलाय. साधी चूक पण कशी महागात पडू शकते याचे उदाहरण आणि एका दिवसात केलेल्या दोन ट्रेक या दोन गोष्टीमुळे हा दिवस कायम लक्षात राहीला.
आम्ही १६ जूनच्या संध्याकाळी पंचवटी एक्स्प्रेसने मुंबईहून १३ जण नाशिककडे निघालो. १६ जणांमध्ये मी, अजिंक्य, सुजाता, साधना, अनिता, सोनाली, पवन, अमोल, सुमित , शुभम, अविनाश, वैभव, शहाजी, सुमित, गणेश आणि हनुमंत असे होतो. गेले आठ दिवस लपलेला वरुण देव शनिवारच्या सकाळपासूनच लाजत लाजत का होईना पण समोर येऊ लागला. मात्र उन पावसाच्या खेळात आमची धाकधूक मात्र वाढवत होता. या मान्सून मधली पहीली ट्रेक आणि पाऊस नाही असे व्हायला नको होते. पण तसे काहीही झाले नाही मुंबई मध्ये शनिवारी दुपारपासून पावसाला बऱ्यापैकी सुरुवात झाली होती. संध्याकाळी सहा वाजताचे काळ्याकुट्ट ढगांचे वातावरण आमचा उत्साह वाढवत होता. आमची ट्रेन वेळेत निघाली. ट्रेकमध्ये नवीन ट्रेकर्सच्या ओळखी, गप्पागोष्टी करत आम्ही नाशिकला रात्री दहा वाजता पोहोचलो. आमचे नाशिकचे परममित्र पवन आणि अविनाश आम्हाला न्यायला स्टेशनला हजर होते. तिथून आम्ही सर्वजण रामशेज - आशेवाडी या पायथा गावाकडे निघालो. रात्री आमची राहण्या खाण्याची सोय आमच्या नाशिकच्या मित्रांनी आणि श्री. उत्तम बोडके सर यांनी खुप चांगल्या पद्धतीने केली होती. आम्ही गेलो त्या गावात या मोसमातला पाऊस अद्यापही पडला नव्हता. पण वातावरणातील कमालीचा गारवा मनाला सुखावत होता. रात्रीचे जेवन आटपून आम्ही सकाळी ४.३० वाजता उठण्यासाठी झोपलो.
पहीली ट्रेक " रामशेज " ची होती. मुंबई हून १३ आणि नाशिक वरून ३ जण , असे मिळून आमचा १६ जणांचा ग्रुप या ट्रेक साठी तयार झाला. सकाळी चहा पाणी आटोपल्यावर बरोबर सहा वाजता ट्रेकला सुरूवात केली. ही अत्यंत सोप्या पद्धतीची ट्रेक होती. आम्ही ज्या ठिकाणी थांबलो होतो त्या ठिकाणाहून रामशेज स्पष्ट किल्ला दिसत होता. कातळमाथाल्या डावीकडून वळसा मारल्यानंतर गडाला जाण्याऱ्या पायवाटेला लागलो. गडावर जाताना वाटेत एक गुहा लागली. चढाई करताना काही ठिकाणची वाट वगळता बाकी मार्ग सुरक्षित पायऱ्यानी बनविला आहे.
आम्ही गुहेजवळ पोहोचलो. गुहेतील राममंदीरात प्रभू राम ,सीतामाई, अंजनीसूत यांच्या मूर्ती शिवाय श्री दत्त महाराजांची मुर्ती व पादुका आणि एका देवीचे स्थान आहे. शिवाय शिवाजी महाराजांचा मोठा फोटोही आत आढळतो. हे मंदीर संपुर्ण कातळात कोरलेले असून मंदिराच्या बाहेरच्या भागात पण खुप जागा आहे. तसेच मंदीराच्या एका बाजूला बंद लाकडी दरवाज्या असलेली एक खोलीही आढळते. तसेच एका ठिकाणी शिलालेख कोरलेला दिसून येतो. मंदीराच्या दुसऱ्या बाजूने गेल्यास एक पाण्याचे टाक आढळते ज्यात अजूनही पाणी आहे. हे पाण्याचे टाक मंदीराच्या बरोबर खाली आहे. पावसाळ्यात ते पूर्ण भरून जाते. त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. मंदीराकडून वर सरकल्यावर लगेचच रामशेजचे पठार दृष्टीस पडते. रामशेज किल्ल्याचा विस्तार फार मोठा नाही. मात्र गडावर पाण्याच्या टाक्या असून वाड्याचे जोते आहेत. तसेच गडावरून गंजकरंग, वाघेरा, देहेरगड- बोरगड व सातमाळा रांग बघता येते.
आम्ही राजशेज पठारावर पोचलो तेव्हा सुर्यनारायण आपल्या लालबुंद किरणातून आपले अस्तित्व दाखवत होते. त्या वेळच्या रंगछटा मन तृप्त करत होत्या.
गडावर पोचल्यावर गडाच्या डाव्या बाजूला कोरीव काम केलेली लांबच्या लांब लॉबी व मध्ये एक दरवाजा दिसला. थोडे पुढे गेल्यावर एका ठिकाणी एक गुप्त मार्ग दिसला. त्या मार्गाच्या शेवटच्या पायरीवर एक छिद्र आढळले. साधारण एक लहान मुल आरामशीर या छिद्रातून खाली जाऊ शकते. या छिद्रातून खाली डोकावले तर महादेवाची पिंडी दृष्टीस पडते.
तिथून आम्ही मागे फिरल्यावर गडाच्या दोन्ही टोकांमधील भागात येऊन पोहोचलो. हा भाग बराचसा अरुंद आहे. समोरच बुजलेल्या अवस्थेत गुप्त दरवाजा दिसला. या वाटेने खाली गेल्यावर आम्हाला समोर देहेरच्या किल्ल्याचे दर्शन झाले. पेठ रोडने चालणारी दूरवरची वाहतूक येथून न्याहाळता आली. गुप्त दरवाजाच्या वर जाणारी वाट रामशेजच्या दुसर्या टोकाकडे जाते व डावीकडची वाट थेट गडाच्या माचीकडे अर्थात, मुख्य बुरुजाकडे जाते. उजवीकडच्या वाटेने थोडे पुढे गेल्यास काही पायर्या दिसून येतात. एका कड्यावर या पायर्यांची रचना केलेली आहे. येथे समोरच किल्ल्याचा मुख्य दरवाजा दिसून येतो. आज या दरवाजाची अवस्था खराब झालेली आहे व बाहेर पडण्याच्या वाटाही बंद झाल्या आहेत. येथून खाली जाण्यासाठी केवळ एका मनुष्याचा रस्ता दिसून येतो. दरवाजा पाहून मुख्य वाटेला आल्यावर समोर मोठा ध्वजस्तंभ नजरेस पडतो. शंभू छत्रपतींच्या जन्मदिनी येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. ध्वजस्तंभ हा किल्ल्याच्या मुख्य बुरुजावर उभारलेला आहे. या ठिकाणी उंच कडा आहे. खाली आशेवाडी गाव दिसते. सुमारे चार-पाच कि.मी. अंतरावर चामर लेणींचा डोंगर दृष्टीस पडतो. त्याहीपलीकडे दूरदूर पांडवलेणींचा डोंगर दिसतो. वातावरण स्वच्छ असेल, तर उजव्या बाजूला दूरवर अंजनेरी व ब्रह्मगिरीचे पर्वत न्याहाळता येतात. बरेच हौशी ट्रेकर्स रामशेज व चामर लेणींचा ट्रेक एका दिवसात पूर्ण करतात.
आम्ही किल्ल्याच्या दुसर्या टोकाकडे जाण्यासाठी माचीवरून परत मागे फिरलो. या टोकाचा परिसर पहिल्यापेक्षा अधिक उंचवट्याचा आहे. थोडे वर चढून आल्यावर आपण एका सपाटीवर येऊन पोहोचतो. येथे पाण्याची दोन टाकी व एक छोटा तलाव आहे. तलावापासून थोडे पुढे चालत गेल्यास एक देवीचे मंदिर दृष्टीस पडते. देवीभक्तांचे येथे सतत येणे-जाणे असावे, असे तेथील पाऊलखुणांवरून दिसून येते. नवरात्रात येथे मोठा उत्सवही होत असतो. मंदिराच्या मागच्या बाजूस पुन्हा उतार चालू होतो. गडाचा दुसरा गुप्त दरवाजा याच ठिकाणी आहे. दुसर्या टोकाशीही दोन पाण्याची टाकी दिसून येतात. या माथ्यावर अनेक पडक्या घरांचे अवशेष विखुरलेले आहेत. मागील बाजूला मोठे उतरते पठार आहे. त्यास वळसा घातल्यास किल्ल्याच्या या टोकाचा घेर ध्यानात येतो. समोरच टेहळणीसाठी वापरण्यात येणारा भोरगड नजरेस पडतो. नाशिक-पेठ रस्त्याचे पूर्ण दर्शन या भागातून होते. या टोकाच्या उजव्या बाजूला काही भग्न मूर्ती व पिंडीचे अवशेष दिसून येतात.
रामशेज पाहताना एक गोष्ट मात्र ध्यानात येते की, या किल्ल्याची रचना ही साधीच आहे. परंतु तरीही मराठ्यांनी साडेपाच वर्षे हा किल्ला झुंजत ठेवला होता, यावरूनच त्यांच्या पराक्रमाची प्रचिती येते. किल्ल्यावरील अवशेष मात्र पडझडीत नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. रामशेज किल्ला हा नाशिक शहराच्या उत्तरेला १४ कि.मी. अंतरावर आहे. नाशिकजवळच्या दिंडोरी पासून हा १० मैलाच्या अंतरावर आहे. प्रभू श्रीराम या किल्ल्यावर विश्रांतीला जायचे, आणि तिथे त्यांची शेज आहे म्हणून या किल्ल्याला रामशेज असे नाव पडले. सह्याद्रीच्या रांगेतील बरेचसे किल्ले घनदाट जंगलात आहेत, डोंगर दर्यांमध्ये वसलेले आहेत. परंतु रामशेज हा किल्ला एका सपाट आणि मोकळ्या मैदानावर आहे. किल्लाच्या जवळपास झाडी, जंगल देखील नाहीये. रामशेज किल्ल्याजवळ एकमेव किल्ला म्हणजे त्र्यंबकगड परंतु तो देखील ८ कोस अंतरावर होता आणि ७ किमी वर देहेरगड हा किल्ला आहे.( या किल्ल्याची ट्रेकची माहीती पुढे देणार आहे ) देहेरगड आणि भोरगड हे दोन वेगवेगळे किल्ले आहेत. पण दॊन्ही किल्ले एकमेकांना लागूनच आहेत. ही सर्व परिस्थिती पाहता किल्ला अगदी एकाकी आहे.
किल्यावरचे वातावरण खुपच आल्हाददायक होते.
संपुर्ण किल्ला पाहून झाल्यावर आम्ही किल्ल्याच्या मध्यभागी खडकाच्या आडोशाला दगडाची चुल करून माझ्या ट्रेक लाईफ मधली गडावर प्रथमच maggy बनवायला सुरूवात केली. या कामी आमच्या ग्रुप लिडर सुजाताजी, पवन, साधना , वैभव आणि शहाजींची यांच्या महतप्रयासाने (महतप्रयास यासाठी बोलतोय की जी Maggy बनवायला दोन मिनिटे लागतात असे बोलले जाते पण तिला गडावरील वारा आणि पडून गेलेल्या पावसामुळे अर्धा पाऊन तास लागला) अत्यंत चवदार आणि गरमागरम Maggy आम्हाला चाखता आली. माझी खुप दिवसांपासूनची इच्छा या ट्रेकला पुर्ण झाली.
नंतर थोडावेळ किल्ल्यावर वर थांबून आम्ही गड उतरायला सुरुवात केली. कारण आम्हाला दुसऱ्यासाठी लगेचच निघायचे होते. एक अविस्मरणीय क्षण मनात साठवत आम्ही आमच्या निवासस्थानी सकाळी १० वाजता पोहोचलो.
समाप्त...
देहेरगडाचा थरार - भाग दुसरा लवकरच....
लेखक - नितीन राणे
सातरल - कणकवली
सध्या वास्तव्य -बदलापूर
मोबाईल - ९००४६०२७६८